महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा पुढाकार
ढोकी : तालुक्यातील गोपाळवाडी शिवारात शेतरस्त्याअभावी जवळपास २० शेतकऱ्यांचा शेताशी संपर्क तुटला होता. परंतु, महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत एका दिवसात रखडलेला हा प्रश्न मार्गी लावला. गोपाळवाडी शिवारातील गट नंबर १०, २० ते ३७ व ४७ मधील शेतकऱ्यांना शेतीकडे ये-जा करण्यासाठी रस्त्याची प्रतीक्षा होती. परंतु, सामोपचार घडून येत नसल्याने तसेच प्रशासनानेही डोळेझाक केल्याने हा प्रश्न रखडला होता. अखेर ढोकी विभागाचे मंडळ अधिकारी एन. डी. नागटिळक व तलाठी शशी यादव यांनी याकामी पुढाकार घेत शेतकऱ्यांची बैठक बोलाविली. यामध्ये सामंजस्यातून शेतरस्ता करण्याचे ठरवून तात्काळ लोकसहभागातून जेसीबीची उपलब्धता करण्यात आली. मंडळ अधिकारी नागटिळक, तलाठी यादव तसेच शेतकरी सौदागर होगले, सुभाष प्रल्हाद शेंडगे, श्रीकृष्ण विकास शेंडगे, बालाजी रामलिंग चव्हाण, संजय मनोहर होगले, बबन थोरवे, राजकुमार होगले, अप्पा शिरसाट, भिमराव होगले, विकास होगले, बळी थोरवे, कुंडलिक होगले, नेताजी चव्हाण आदींच्या उपस्थितीत हा शेतरस्त्याचा प्रश्न एका दिवसात मार्गी लावण्यात आला. यामुळे गोपाळवाडी येथील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.