उस्मानाबाद : पीक विम्याची अचूक नुकसान भरपाई मिळण्याच्या अनुषंगाने ई-पीक पाहणी हा उपक्रम फायदेशीर ठरू शकतो. याअनुषंगाने शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील पिकांची माहिती ॲपमध्ये भरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे. शुक्रवारी त्यांनी स्वत: हाडोंग्री शिवारात पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना याबाबत अवगत केले.
राज्य शासनाने ई-पीक पाहणी हा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत एक ॲप विकसित करण्यात आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची, क्षेत्राची माहिती भरावयाची आहे. ही माहिती पुढे विविध प्रकारच्या दाव्यांमध्ये उपयुक्त ठरणार आहे. कृषी पतपुरवठ्यासाठी त्याचा लाभ होणार आहे. शिवाय पीक विमा व पीक पाहणी दावे तत्काळ निकाली काढण्याची प्रक्रियाही यामुळे सुलभ होणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई व योग्य मदत मिळण्यासही या उपक्रमातून शेतकऱ्यांना मदत होणार आहे. याअनुषंगाने शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी हे ॲप डाऊनलोड करून त्यात आपली माहिती अचूक भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे. दरम्यान, शुक्रवारी त्यांनी स्वत: भूम तालुक्याच्या दौऱ्यावर असताना हाडोंग्री शिवारात थांबून प्रसाद वाघमारे यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली. तसेच या उपक्रमाबाबत शेतकऱ्यांना अवगत केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रूपाली आवले, उपविभागीय अधिकारी सचिन गिरी, तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश बिराजदार व शेतकरी उपस्थित होते.