लोहारा : शहरातील प्रभाग क्र. १० मधील झिंगाडे डीपीजवळ गटाराचे पाणी साचल्याने घाणीचे साम्राज्य पसरले हाेते. तसेच डांसाचा प्रादुर्भाव वाढल्याने परीसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले हाेते. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. यांची दखल घेल सफाई कामगारानी गटारीची साफसफाई केली आहे.
लाेहारा-हिप्परगा रस्त्याची चाळण
लोहारा : लोहारा ते हिप्परगा रवा या सात किमीच्या रस्त्यावर जागाेजागी खड्डे पडले आहेत. परिणामी चालकांना वाहन चालवताना दाेरीवरची कसरत करावी लागत आहे. एवढेच नाही तर छोटे-मोठे अपघातही घडत आहेत. संबंधीत विभागाने याकडे लक्ष देऊन खड्डे बुजवावेत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे विधानसभा अध्यक्ष विजयकुमार लोमटे यांनी केली आहे.
अवैध दारूविक्री जाेमात
लोहारा : लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द, खेड शिवारात अवैद्य दारुविक्री मोठ्याप्रमाणात सुरु आहे. याबाबत तक्रारीही वाढल्या आहेत. तक्रारींची दखल घेऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष दयानंद राठोड यांनी केली आहे.
सिमेंट रस्त्याचे काम सुरू
लोहारा : लोहारा शहरातील प्रभाग क्र. १४ मध्ये मागील अनेक वर्षापासून अंतर्गत रस्त्याचा प्रश्न कायम होता. सध्या या रस्त्याचे सिमेंट काॅंक्रिटीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील रहिवाश्यांतून समाधान व्यक्त हाेत आहे.