उस्मानाबाद : जिल्हा तिसऱ्या स्टेपमध्ये हाेता. त्यामुळे काेराेनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्यात आलेले नाही. त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी शाळांवरील गुरुजींची उपस्थिती पन्नास टक्केच राहील, असे जिल्हा प्रशासनाकडून नमूद करण्यात आले हाेते. या पत्राला अनुसरूनच शिक्षण विभागानेही पत्र काढले हाेते. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच शाळेतील गुरुजींची उपस्थिती पन्नास टक्केच आहे. परिणामी अन्य जिल्ह्यांप्रमाणे वेळेवरून उडालेल्या गाेंधळाला थारा मिळू शकला नाही.
राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरू झाल्या आहेत. काही जिल्ह्यांत शिक्षकांच्या उपस्थितीबाबत दाेन पत्रके निघाली. शिक्षण संचालकांनी ५० टक्के उपस्थितीचे फर्मान साेडले, तर जिल्हा परिषदांनी ५० टक्के उपस्थितीचे पत्र काढले. या दाेन पत्रांमुळे शिक्षकांमध्ये पुरता गाेंधळ उडाला. शाळेवर नेमक्या किती टक्के शिक्षकांनी उपस्थित राहायचे, असा प्रश्न शिक्षक एक दुसऱ्याला विचारत हाेते. दरम्यान, उस्मानाबादेत काेराेना रुग्णसंख्या अपेक्षित प्रमाणात कमी झालेली नव्हती. त्यामुळे शासनाने निश्चित केलेल्या पहिल्याऐवजी थेट तिसऱ्या टप्प्यात उस्मानाबादचा समावेश झाला. परिणामी काेराेनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध प्रशासनाला उठविता आले नाहीत. निर्बंध काहीअंशी शिथिल करण्यात आले. या आदेशातच जिल्हा प्रशासनाने शाळांतील शिक्षकांची उपस्थिती पन्नास टक्के निश्चित केली हाेती. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने पत्र काढले हाेते. दरम्यान, दाेन पत्रांवरून राज्यभरात गाेंधळ उडाल्यानंतर शासनाने ५० टक्के उपस्थिती निश्चित केली. यानंतर उस्मानाबाद जिल्हा परिषदेनेही दुसरे पत्र काढले. त्यामुळे अन्य जिल्ह्यांप्रमाणे उस्मानाबादेत शिक्षक उपस्थितीच्या प्रमाणावरून गाेंधळ उडाला नाही.
चाैकट...
शिक्षण विभागाने शाळा सुरू हाेण्यापूर्वी पत्र काढले हाेते. ते पत्रही ५० टक्के उपस्थितीच्या अनुषंगाने हाेते. शासनाने स्वतंत्र पत्र काढून ५० टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य केली. त्यामुळे शिक्षकांच्या उपस्थितीवरून आपल्याकडे गाेंधळ उडण्याचा प्रश्नच आला नाही. आपल्याकडील सर्व शाळांतून सध्या विद्यार्थ्यांना ॲप तसेच ऑनलाइन पद्धतीने ज्ञानदान करण्यात येत आहे.
-गजानन सुसर, शिक्षणाधिकारी.
दाेन्ही पत्रके ५० टक्के उपस्थितीचीच...
काेराेनाचा संसर्ग फारसा ओसरला नसल्याने शिक्षण विभागाने शाळा सुरू हाेण्यापूर्वीच पत्र काढून शाळेवर शिक्षकांची ५० टक्केच उपस्थिती निश्चित केली हाेती. राज्यातील काही जिल्ह्यांत मात्र शिक्षण संचालकांनी ५० टक्के उपस्थिती तर जिल्हा परिषदांनी तब्बल १०० टक्के उपस्थित राहण्याचे फर्मान गुरुजींना काढले हाेते. त्यामुळे गाेंधळाचे वातावरण निर्माण झाले हाेते. शासनाच्या पत्रकानंतर हा गाेंधळ निवळला. मात्र, उस्मानाबादेत दाेन्ही पत्रे ५० टक्के उपस्थितीची असल्याने अन्य जिल्ह्यांप्रमाणे गाेंधळ उडाला नाही.
रिकामे बाकडे अन् गुरुजींची हजेरी
१५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. परंतु, काेराेनामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास मनाई आहे. मात्र, ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती बंधनकारक केली आहे. संबंधित शिक्षकांनी शाळेवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने ज्ञानदान करण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा किलबिल ऐकावयास येत नाही. सध्या केवळ रिकामे बाकडे आणि शिक्षकांची हजेरी एवढेच चित्र पहावयास मिळत आहे.
शिक्षक
१३,९७८
शिक्षकेतर कर्मचारी
१७००
जिल्ह्यातील शाळा
१५३३
जिल्हा परिषद शाळा
१०८३
अनुदानित शाळा
३९०
विनाअनुदानित शाळा
१३
स्वंयअर्थसहाय्यित शाळा
८०