- अविनाश ईटकरधाराशिव/परंडा : मागील चार महिन्यापासून कपिलापुरी (ता. परंडा) शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे ग्रामस्थांसह वन विभागानेही सुटकेचा निःश्वास सोडला.
कपिलापुरी शिवारात मागील चार महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. एक-दोन नव्हे तर तब्बल २० ते २२ जनावरांचा फडशा पडला होता. त्यामुळे ग्रामस्थांसह पशुपालक शेतकऱ्यात भीतीचे वातावरण होते. दरम्यान, वन विभागाने त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. मात्र, बुधवारी रात्री गज तोडून पिंजऱ्या बांधलेल्या बोकडाची शिकार केली होती.
यानंतर वन विभागाने पिंजरा दुरुस्त करून दुसऱ्या जागी ठेवला असता, गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला. चार महिन्यापासून बिबट्याच्या दहशतीखाली वावरणाऱ्या ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला.