तामलवाडी : माघवारीच्या निमित्ताने माघ एकादशी सोहळा पंढरपूरमध्ये साजरा करण्यास प्रतिबंध घातले आहेत. तत्पूर्वी पंढरीत हजेरी लावून वारी पूर्ण करण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील खोताचीवाडी येथील वारकऱ्याची दिंडी शुक्रवारी रवाना झाली.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमधील महत्त्वाच्या एकादशी सोहळ्यावर शासनाने प्रतिबंध घातले आहेत. माघ एकादशी २३ फेब्रुवारी रोजी असून त्या अगोदर ८ किमी अंतरापर्यंत वारकऱ्यांच्या गर्दीला आळा बसावा म्हणून प्रतिबंधात्मक आदेश लागू हाेण्याची शक्यता गृहीत धरून तुळजापूर तालुक्यातील खोताचीवाडी येथील सहा वारकऱ्याची दिंडी शुक्रवारी पंढरपूरकडे पायी रवाना झाली. ही दिंडी मंगळवारी पंढरपूरमध्ये दाखल होणार असून चंद्रभागा स्थान, विठ्ठल रुक्मिणी दर्शनासह धार्मिक विधी करण्यात येतील, असे वारकरी मंडळाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष नागनाथ शिंदे यांनी सांगितले. भर उन्हात कपाळी अष्टगंधाचा टिळा, गळ्यात टाळ, डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन मुखाने विठ्ठल नामाचा गजर करीत विठ्ठल भेटीची आस घेऊन चालत असलेल्या या दिडींचे शुक्रवारी सांगवी (काटी) शिवारात आगमन झाले. या दिंडीचे जाेरदार स्वागत करण्यात आले. दिंडीत वारकरी मंडळाचे तालुकाध्यक्ष नागनाथ शिंदे, महादेव देडे, ब्रम्हानंद क्षीरसागर, संभाजी सरडे, काशीबाई देडे हे सहा वारकरी सहभागी झाले होते. दिडींच्या स्वागतावेळी बाळासाहेब मगर, मारूती सातपुते, विठ्ठल मगर, महेश मगर आदी सहभागी आहेत.