बैठकीचे आयोजन करण्याची मागणी
कळंब : तालुक्यातील जनतेच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी बैठकीचे आयोजन करून शासन निर्देशांचे पालन करावे, अशी मागणी लाल पँथर संघटनेने केली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बजरंग ताटे, जिल्हाध्यक्ष माया शिंदे यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. ३ मार्च २०२० रोजी राज्याच्या ग्रामविकास विभागाने काढलेल्या आदेशात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाऱ्यांनी बैठक आयोजित करावी व यामध्ये नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करावा, असे निर्देश असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती चालू ठेवण्याची मागणी
उस्मानाबाद : मागासवर्गीयांच्या शिक्षणासाठी तरतूद करण्यासाठी आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून मागासवर्गीयांसाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नाने सुरू केलेली मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती वाचविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सम्यक विद्यार्थी आंदोलन व सर्व कमिटीच्या वतीने पंतप्रधान कार्यालयाला निवेदन सादर करण्यात आले. यावेळी अलंकार बनसोडे, सचिन दिलपाक, अक्षय बनसोडे, सचिन गायकवाड, अरविंद डोंगरे आदी उपस्थित होते.
आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी
तुळजापूर : तालुक्यातील अणदूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शासन करावे, अशी मागणी भाजप महिला मोर्चा व युवती मोर्चा वतीने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा स्वाती जाधव-पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्या मीनाताई सोमाजी-कदम, माधुरीताई गरड, वृषाली दंडनाईक, ज्योशीला लोमटे, अंजली बेताळे, प्रज्ञा फंड, धनश्री ताड, दमयंती वाकुरे, अलका मगर, क्रांती थिटे, पूजा देडे, पूजा राठोड उपस्थित होत्या.