बालाजी आडसूळ
कळंब : आजीबाईंच्या बटव्यात विविध व्याधींवरील घरगुती उपचार दडलेले असतात. अनुभवाच्या शिदोरीतून आलेले हे नुस्खे ‘घरचा वैद्य’ म्हणून चांगलेच कामाला येतात. सध्याच्या कोरोनाच्या धास्तीत घरातील आजीबाईच्या बटव्यातील अशा अनेक अनुभवसिद्ध ‘होम रेमेडीज’ अनेकांच्या आरोग्यास हातभार लावत आहेत.
आरोग्यविषयक संकटात आपणास प्रथम सल्ला मिळतो तो घरातील जाणत्या महिला मंडळींचा. पिढ्यानपिढ्यांच्या अनुभवातून आजीबाईच्या हाती आलेले विविध नुस्के प्रारंभिक अवस्थेत घरच्या घरी प्रयोगात येतात. अगदी सर्दी, खोकला आला तर काढा अन् मध, लिंबाच्या रसाने कफ पाढा, असे या घरगुती उपचाराचे स्वरूप असते.
घरातील ज्येष्ठांत मोडणाऱ्या या आजीबाईच्या बटव्यात अगदी एखंड, सुंठ, लवंग, दालचिनी असे औषधी गुणधर्म असलेले बरेच काही दडललेले असते. दैनंदिन लागणाऱ्या वस्तू, घरातली भटारखान्याच्या मसाला डब्यातील हळद, आले, जिरे, मोहरी, मिरी याच्या माध्यमातून आजाराला दूर करण्यासाठी आजीबाई प्रयत्न करीत असतात.
सध्याच्या कोरोनाच्या भयंकर महामारीत आजीबाईचे असे नुस्खे नव्या पिढीला अनुभवयाला मिळत आहेत. कोरोनात सर्दी, खोकला, कफ, ताप यांचा प्रतिकार करावा लागतो. रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते, श्वसनयंत्रणा कमकुवत होते. यावेळी आजीबाईच्या बटव्यात या सर्वांवर उपचार असतोच अन् याचा अवलंबही होत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनापासून बचावासाठी....
हळदीचे दूध नव्हे गोल्डन मिल्क
घरात सर्रास वापरली जाणाऱ्या हळदीमध्ये करक्युमिन हा औषधी घटक असतो. हळद अन्टीऑक्सीडंट, अन्टिबॅक्टेरियल आहे. यामुळे घशासह विविध संसर्ग कमी करते, जिवाणूसंसर्ग रोखते. खोकला, कफ यांना प्रतिबंध करते. रोगप्रतिकारक शक्ती वृद्धी करते. दुध, हळद व गूळ यांचे एकत्र सेवन कोरोना काळात कामाचे आहे.
सुंट, लसूण अन् आलं, सर्दी पडसं गेलं
स्वयंपाकघरातील अद्रक किंवा त्यास वाळवून मसाला डब्यात जावून बसलेली सुंठ सर्दी, ज्वर यांवर बहुगुणी ठरलेली आहे. लसूण पण असाच उपयोगी आहे. उष्ण असलेल्या या वस्तू कफ निवारक आहेत. म्हणूनच पूर्वी बालकांला कफ झाल्यास आजी लसणाच्या कुड्यांची माळ घालत असे. श्वसन संस्था बळकट करणाऱ्या या वस्तूंचा वापर म्हणून अनेक होम रेमडीजमध्ये केला जातो
तुळस, मध, मिरे अन् जिरे...
तुळशीत मोठ्या प्रमाणात असलेले ॲन्टी-बॅक्टेरियल आणि ॲन्टी-इंफ्लिमेंट्री गुण रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. तुळशीची पानं फ्लूचा धोकाही दूर करतात.
तुळस, मिरीचा काढा सर्दीवर रामबाण उपाय. असाच बहुगुणी मध ताप, खोकला, कफ या आजारात कामी येतो. लिंबू, अद्रक, गुलकंद यासह मधाचे विविध नुस्खे आहेत.
डाॅक्टरांचा काेट...
पिढ्यानपिढ्याच्या अनुभवातून आलेले घरगुती उपचार सौम्य आजारावर, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सिद्ध झाले आहेत. घरात दैनंदिन वापरातील असणारे हळद, सुंठ, लवंग, दालचिनी, मिरे, जिरे, वेखंड, जायफळ इत्यादींचा योग्य मात्रेमध्ये व अनुपानासह उपयोग केला असता यांच्यातील औषधी गुणांचा चांगला परिणाम दिसून येतो. सध्या कोरोना काळात सर्दी खोकला, कफ, रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या अनेक होम रेमिडीज आहेत. या घरगुती औषधीचा अति वापर ही त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे तज्ज्ञाचा सल्ला घेतलेला उचित राहते.
-
डॉ. गिरीश द. कुलकर्णी, श्री. विश्वरूप आयुर्वेदिक चिकित्सालय, कळंब.
पॉइंटर्स
एकूण रुग्ण
५१७१४
कोरोनामुक्त
४६१३०
उपचारावर ४४१४
मृत्यू ११७०