उमरगा : जिल्हा परिषद माध्यमिक शाळांतील २५७ शिक्षकांना फेब्रुवारी महिना सरत आला तरी डिसेंबर व जानेवारी महिन्याचे वेतन मिळालेले नव्हते. याबाबत ‘लोकमत’ ने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर प्रशासनाने तत्काळ डिसेंबर महिन्याचा पगार शिक्षकांच्या खात्यावर जमा केला. तसेच जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांच्या शिष्टमंडळाने देखील बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांची यांची भेट घेऊन अनियमित वेतनाबाबत चर्चा केली असता ५ मार्चपर्यंत जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचा पगार देखील जमा करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
जिल्हा परिषद अंतर्गत विविध शाळेमधील २५७ शिक्षकांचे पगार गेल्या चार महिन्यापासून अनियमित होत आहे. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला कर्मचाऱ्यांचा पगार करावा, असे शासनाचे आदेश असतानाही तीन तीन महिने पगार होत नसल्याने शिक्षक त्रस्त झाले होते. यासंदर्भात ‘लोकमत’ बुधवारी ‘पगारी अभावी २५७ शिक्षकांची कोंडी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत प्रशासनाने डिसेंबर महिन्याचा पगार त्यांच्या खात्यावर जमा केला. मात्र, जानेवारी महिन्याचा पगार अद्याप प्रलंबित आहे.
माध्यमिक शिक्षक संघाचे शिष्टमंडळाने बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. फड व जि.प . उपाध्यक्ष धनंजय सावंत यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ५ मार्चपर्यंत जानेवारी व फेब्रुवारी या दोन्ही महिन्याचे वेतन होईल. तसेच यापुढे वेतनामध्ये सातत्य राहील, असे आश्वासन दिले. यामुळे माध्यमिक शिक्षक संघाने १ मार्च रोजीचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण रद्द केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष महेश कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष शोभा टोनपे, उपाध्यक्ष चव्हाण, तुळजापूर तालुकाध्यक्ष पांचाळ, परंडा तालुकाध्यक्ष कलशेट्टी, उमरगा तालुका सचिव घाटवाले, परंडा तालुका खरात आदी उपस्थित होते.