उस्मानाबाद : भंडारा येथील घटनेनंतर रुग्णालयांचे फायर ऑडिट, तसेच इलेक्ट्रिक ऑडिटचा (धाेक्यांची तपासणी) मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ४४ प्राथमिक आराेग्य केंद्रांची वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न् केला असता, आजवर एकाही केंद्रांतील धाेक्यांची तपासणी झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे.
ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर व नाममात्र शुल्कात आराेग्य सेवा मिळावी, यासाठी राज्य शासनाच्या वतीने गावाेगावी प्राथमिक आराेग्य केंद्र, उपकेंद्र उभी केली आहेत. जिल्हाभरात प्राथमिक आराेग्य केंद्रांची संख्या ४४ एवढी आहे. येथून प्रसूतींसह हिवतापाची लक्षणे असलेल्या व्यक्तींचे रक्तजल नमुने संकलन करणे, सर्पदंश, श्वान दंशाच्या रुग्णांवर उपचार केले जातात. शिवाय, विविध आजारांच्या रुग्णांना औषधे पुरविली जातात. त्यामुळे अशा केंद्रांचे फायर, तसेच इलेक्ट्रिक ऑडिट हाेणे गरजेचे आहे. भंडारा येथील घटनेनंतर हा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यातील प्राथमिक आराेग्य केंद्रांच्या बाबतीतील वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, सर्व ४४ आराेग्य केंद्रांतील धाेक्यांची तपासणी झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला. या घटनेनंतर कुठे शासन आणि प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. प्राथमिक आराेग्य केंद्रांचेही ऑडिट करून घेण्यासंदर्भात जिल्हास्तरीय यंत्रणेला निर्देश आले आहेत. त्यानुसार आता आराेग्य विभागाकडूनही तयारी सुरू करण्यात आली आहे.
कोट...
प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील अग्निरोधक यंत्र बसविण्यात आलेले आहेत. या यंत्राची तपासणी केली जाते. त्यांच्या देखभालीकडे नियमित लक्ष दिले जात आहे. इलेक्ट्रिक ऑडिट अद्याप एकाही प्राथमिक आरोग्य केंद्राचे झालेले नाही. शासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्राचे फायर ऑडिट व इलेक्ट्रिक ऑडिट करण्याबाबत आदेश आले आहेत. या आदेशानुसार ऑडिट करण्यात येणार आहे.
डॉ. हनुमंत वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी,
उस्मानाबाद १०
कळंब ६
वाशी ३
परंडा ४
उमरगा ५
लोहारा ४
भूम ५
तुळजापूर ७