कळंब तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची निवडणूक आगामी १५ जानेवारी रोजी हाेत आहे. यासाठी तहसीलदार मंजुषा लटपटे, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अस्लम जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
याचाच एक भाग म्हणून प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी याशिवाय नियंत्रण ठेवणारे १३ झोनल अधिकारी व निर्णय घेणारे २३ निवडणूक निर्णय अधिकारी असे ९५४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण मंगळवारी ठेवण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार अस्लम जमादार यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून विविध टप्पेनिहाय सविस्तर माहिती दिली. केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना निवडणूक नियमावली, जबाबदारी, कर्तव्य, कार्य यासह बॅलेेट युनिट, कंट्रोल हातळणी याविषयी अवगत करण्यात आलेेे. बैठकीसाठी मंडळ अधिकारी शंकर पाचभाई, खलील शेख यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, बैठकीस २८ जण गैरहजर राहिले. या सर्वांनाच तातडीने नाेटिसा बजावण्यात आल्या आहेत.
चाैकट..
२४ तासांची मुदत
केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर मंगळवारच्या आयोजित प्रशिक्षणास हजर रहावे असे सूचित करूनही २८ कर्मचारी गैरहजर होते. या कर्मचाऱ्यांना २४ तासाच्या आत लेखी खुलासा करावा अन्यथा लोकप्रतिनिधींत्व अधिनियमान्वये कारवाई करण्यात येईल अशी नोटीस बजावण्यात आली आहे.