कळंब : सध्या काही गावांत कृषी पंपांना विद्युत पुरवठा करताना फिडरवर एक दिवसआड असा विद्युत पुरवठा केला जात असल्याने शेती पिकांचे नुकसान होत आहे. यामुळे ही पद्धत बंद करून निर्धारित वेळेत दररोज शेतीसाठी वीजपुरवठा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. श्रीधर भवर यांनी केली आहे.
तालुक्यात यंदा रब्बी हंगामातील पिकांचे क्षेत्र वाढले आहे. यातून उत्पादन हाती घेण्यासाठी पिकांना पाणी देणे गरजेचे असताना अनेक गावांत सुरळीत विद्युत पुरवठ्याची समस्या जाणवत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. एक तर चोवीस तासांतील फक्त आठ तास वीज शेती पंपासाठी निर्धारित आहे. यातही बिघाड असतो तोही वेगळाच. यातच काही उपकेंद्रांतून कृषी पंपासाठी जाणाऱ्या फिडरवर एक दिवसआड असा वीजपुरवठा केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध असतानाही पिकांना देता येत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. श्रीधर भवर यांनी महावितरण कंपनीच्या अभियंत्याकडे एक दिवसआड या पद्धतीने शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, निर्धारित वेळापत्रकानुसार दररोज वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी केली आहे.
चौकट...
आढळा फिडर : काही कळंबकर परेशान
प्रा. भवर यांनी यासंबंधी कळंब येथील काही शेतकऱ्यांचे उदाहरण दिले आहे. त्या शेतकऱ्यांचे निवेदनही सोबत जोडले आहे. यानुसार कळंब येथील काही शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना आढळा फिडरवरून पुरवठा जोडला आहे. या फिडरवर सध्या एक दिवसआड सप्लाय दिला जातो. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्याचे प्रा. भवर यांनी सांगितले.