तुळजापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरापेक्षा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला होता. याला तालुक्यातील कामठादेखील अपवाद उरले नाही. येथे १५ एप्रिल ते ११ मे या कालावधीमध्ये ६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. तसेच यातील एकाचा कोरोनाने बळी गेला. त्यानंतर मात्र ग्रामपंचायत आणि नागरिकांनी शासनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करीत महिनाभरात कोरोनाला हद्दपार करण्यात यश मिळविले.
तुळजापूर तालुक्यातील अठराशे लोकसंख्या असलेल्या कामठा गावात कोरोनाच्या पहिल्या लाटेत ८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. उपचारानंतर ते सुखरूप घरी परतले. मे २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर ग्रामपंचायतीने तो भाग सील करून गावामध्ये ‘डोअर टू डोअर’ सर्व्हे करून तपासणी करून नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना केल्या. संपूर्ण गावात ३ वेळा जंतुनाशक फवारणी करून घेतली. तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना शाळेत क्वारंटाईन ठेवण्यात आले. गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्य संख्येनुसार मास्क, सॅनिटायझर बॉटल, साबणाचे वाटप करण्यात आले. या सर्व उपाययोजनांमुळे पहिली लाट आटोक्यात आली.
दरम्यान, दुसऱ्या लाटेत येथे १५ एप्रिल ते ११ मे या कालावधीमध्ये ६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यातील एकाचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांत चिंता वाढली होती. यामुळे ग्रामपंचायतीसह गावातील नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे कडक पालन सुरू केले. दोन वेळा संपूर्ण गावात जंतुनाशक फवारणी करून घेतली. ग्रामपंचायतीच्यावतीने आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटपदेखील करण्यात आले. जिल्हा परिषद शिक्षक, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती आणि स्वयंसेवक यांनी प्रत्येकी ५० कुटुंबे दत्तक घेऊन दररोज तपासणी करून आरोग्याची काळजी घेतली. मागील महिनाभर या नियमांची अंमलबजावणी झाल्याने गावातून कोरोना हद्दपार झाला. सध्या गावात कोरोनाचा एकही रुग्ण नसला तरी ग्रामस्थांकडून नियमांची अंमलबजावणी सुरूच आहे.
यांनी घेतला पुढाकार
गाव कोरोनामुक्त करण्यासाठी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांचेही चांगले सहकार्य मिळाले. यात प्रामुख्याने पंचायत समिती उपसभापती शरद जमदाडे, सरपंच बळीराम साळुंखे, उपसरपंच सरिता अमोल रोकडे, ग्रामसेवक सतीश शिंदे, आशा कार्यकर्ती रेश्मा सय्यद, अंगणवाडी सेविका सविता सुरवसे, भाग्यश्री बनकर, अंगणवाडी मदतनीस शीला जमदाडे, लता रोकडे, शिपाई दादा रोकडे, स्वयंसेवक विजय क्षीरसागर, मुख्याध्यापक नागनाथ काळुंके, शिक्षक दत्ता वाडकर, रामचंद्र पाटील, गहिनीनाथ धुर्वे, अविनाश माने, रेवनाथ क्षीरसागर, मंगेश औटी यांनी परिश्रम घेतले.
कोट......
कामठा गावात दुसऱ्या लाटेत ६ जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्ण आढळून येतात तत्काळ गावात दोन वेळा जंतुनाशकाची फवारणी केली. आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप केल्या. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी गावकऱ्यांचीदेखील चांगली साथ मिळाली. यामुळेच कोरोनाला गावाबाहेर काढणे शक्य झाले आहे.
- बळीराम साळुंके, सरपंच
200621\4929img-20210617-wa0019.jpg
कामठा येथे जंतुनाशक फवारणी करत असलेल्या फोटो