खबरदारीचे वास्तव काय...
एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही सार्वजनिक ठिकाणी घ्यावयाच्या खबरदारीबाबत कोणीही अद्याप फारसे गंभीर दिसत नाहीत. कारवाई व दंडाच्या भीतीने नाही म्हणायला मास्क वापरणाऱ्यांची संख्या किंचित वाढली आहे; मात्र अजूनही बाहेर फिरणारे जवळपास ४० टक्केपेक्षा जास्त लोक मास्क वापरताना दिसत नाहीत. सुरक्षित अंतर राखण्याचे तर भान कोणालाही राहिले नाही. बँक, हॉटेल्स, बसस्थानक, शासकीय कार्यालये व अन्य वर्दळीच्या ठिकाणी अजूनही खेटून गर्दी दिसते.
तयारीला मार्च एण्डचाही अडसर...
जिल्ह्यात दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी सुरू केली आहे. १२६० खाटांचे कोविड सेंटर्स उघडण्यात आले आहेत. कोरोनाविषयक विविध उपाययोजनांसाठी नोडल अधिकारी नियुक्त केले गेले आहेत. परिस्थितीवर दररोज नजर ठेवली जात आहे. पोलिसांनीही रात्रीची संचारबंदी कडक करून गुरुवारपासून शहरात ९ नंतर फिरणाऱ्यांना वेसण घालण्यास सुरुवात केली आहे; मात्र एकूणच गतीशील उपाययोजनांना मार्च एण्डच्या कामांचाही अडसर आहेच. वर्षअखेरच्या कामकाजाचा तणाव अन् कोविड उपाययोजनेची कामे असा दुहेरी लोड असल्याने अडचणी वाढल्या आहेत.