तुळजापूर शहरातील एसटी कॉलनी भागात राहणारा सुरज प्रदीप कांबळे (२५) हा गेल्या काही वर्षांपासून महावितरणमध्ये आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून कंत्राटी वायरमन म्हणून काम करत होता. शनिवारी दुपारी तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडवरील एका हॉस्पिटलच्या वैयक्तिक नवीन विद्युत रोहित्राला कनेक्शन देण्यासाठी आवश्यक असलेले खांबावरील जंप जोडण्यासाठी तो अन्य सहकाऱ्यांसह तेथे गेला होता.
खांबावर चढून जम्प जोडताना सूरजला आनक विजेचा धक्का बसल्याने तो खांबावरून खाली पडला. यावेळी त्याच्या डोक्यालाही गंभीर मार लागल्याने. तेथे उपस्थित सहकाऱ्यांनी व नागरिकांनी तात्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. यानंतर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय तपासणीअंती सूरजला मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, सुरज हा एकुलता एक मुलगा आणि दोन बहिणी असा त्याचा परिवार होता. त्यांच्या वडिलांचे तीन वर्षांपुर्वी दुर्धर आजाराने निधन झाल्याने कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती. कंत्राटी वायरमन म्हणून काम करतानाच तो उर्वरित वेळेत मेसही चालवीत होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी, लहान मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे.
कोट...
ही घटना दुर्दैवी आहे. चांगले काम करणारा कर्मचारी नियतीने हिरावला. लाईनचे काम करीत असताना परमिट घेतल्याने तेथील विद्युत सप्लाय बंद झाला होता. परंतु, कोणाचे तरी जनरेटर किंवा इन्व्हर्टरचा रिटर्न सप्लाय आल्याने त्याला शॉक लागला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. रिटर्न सप्लाय कोठून आला, याची पाहणी केली जात आहे.
-एस. व्ही. घोदे, उपकार्यकारी अभियंता