उस्मानाबाद : खड्ड्यात पडून जखमी झालेल्या शेतकऱ्याला १ लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश ग्राहक मंचाने विमा कंपनीला दिले आहेत. ही रक्कम ४५ दिवसांच्या आत देण्याबाबतही आदेशात नमूद करण्यात आले आहे. ग्राहक मंचाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यास माेठा दिलासा मिळाला आहे.
कळंब तालुक्यातील डिकसळ येथील हरिश्चंद्र हे अंधाराचा अंदाज न आल्याने १८ ऑक्टाेबर २०१६ राेजी बांधकामासाठी खाेदलेल्या खड्ड्यात पडल्यामुळे त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. सदरील अपघातामुळे त्यांना १८ टक्के कायमस्वरूपी अपंगत्व आले. या घटनेनंतर हरिश्चंद्र जगताप यांनी तालुका कृषी अधिकारी कळंब यांच्याकडे गाेपीनाथ मुंडे शेतकरी याेजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रस्ताव दाखल केला. छाननीअंती हा प्रस्तव नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडे मंजुरीसाठी दाखल केला हाेता. परंतु, हरिश्चंद्र पवार यांना केवळ १८ टक्के अपंगत्व आल्याने कारण देत त्यांचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. यानंतर जगताप यांनी ॲड. एस. एस. रितापुरे यांच्या मार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयाेगाकडे २ मे २०२८ राेजी याचिका दाखल केली. सुनावणीदरम्यान ॲड. रितापुरे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून ग्राहक मंचाने अपघातग्रस्त शेतकऱ्यास विमा कंपनीने एक लाख रूपये नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश दिले. ही रक्कम ग्राहक मंचाने निर्णय दिलेल्या तारखेपासून दर साल दर शेकडा ८ टक्के व्याज दराने देण्याबाबत आदेशात म्हटले आहे. यासाठी ४५ दिवसांची डेडलाईन दिली आहे. ग्राहक मंचाच्या या निर्णयामुळे अपघातग्रस्त शेतकऱ्यास दिलासा मिळाला आहे.