कळंब : शहरातील भरवस्तीत व मुलींच्या शाळेजवळ असलेले बीअरबार बंद करावेत; तसेच या बारला डोळे झाकून परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
कळंब शहरातील जि. प. मुलींच्या शाळेजवळ मागील काही वर्षांपासून बीअरबार सुरू करण्यात आले. या बीअरबारला विरोध झाल्यानंतर ते काही दिवस बंद ठेवण्यात आले. तत्कालीन आमदारांनीही कन्या शाळेजवळ असलेल्या या बारबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर हे बार काही दिवस बंद ठेवण्यात आले; परंतु पुन्हा ते बार कोणत्या आधारावर सुरू केले, याबाबत कोणी स्पष्ट सांगत नसले तरी मागील काही वर्षांपासून ते सुरू असल्याने या भागातील नागरिकांना विशेषतः महिलांना मद्यपींचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या कोरोनामुळे शाळा बंद असली तरी शाळा सुरू झाल्यानंतर मुलींना शाळेत पाठवावे की नाही, असा प्रश्न पालकांसमोर उपस्थित होतो आहे.
भरवस्तीत व मुलींच्या शाळेजवळ दारूविक्री करण्यास नियमाने बंदी असतानाही अधिकाऱ्यांनी या बारला परवानगी देणे हे बेकायदेशीर असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हे बीअरबार बंद करावेत, या बारला नाहरकत प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणीही या निवेदनात केली आहे. निवेदनावर दत्तात्रय तनपुरे, कुमार करडे, विकास भालेकर, बंडू गुंजाळ, खंडू निगुळे, अक्षय जमाले, सचिन काळे, आकाश चोंदे, अजिंक्य चौधरी आदींच्या सह्या आहेत.