जिल्ह्यात लस घेण्यासाठी नागरिकांचा कल वाढत आहे. मात्र, लसीचा स्टॉक संपत असल्याने दोनशेच्या जवळपास केंद्र बंद ठेवण्यात आलेली आहेत. ४५ वर्षांपुढील नागरिकांना मोजक्याच केंद्रावर रोटेशन पद्धतीने लस दिली जात होती. मात्र, मागील दोन दिवस ही मोहीम लसीअभावी ठप्प झाली होती. सोमवारी १९ हजार कोविशिल्ड लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. मंगळवारी उस्मानाबादेतील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, खिरणी मळा व शाहू नगर येथील नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र, उस्मानाबाद पोलीस रुग्णालय व उमरगा उपजिल्हा रुग्णालयांतर्गत चिंचोळी हॉस्पिटल या केंद्रावर आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, ४५ वर्षांपुढील नागरिकांना कोविशिल्ड लस मिळणार आहे. सकाळी ९ ते १२ वेळेत दुसरा डोस देय असणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल, तर १२ नंतर पहिला व दुसरा दोन्ही डोस उपलब्ध असणार आहेत.
१८ ते ४४ वयोगटास ११ केंद्रावर डोस
कोविन पोर्टलवर ऑनलाइन स्लॉट बुकिंग केलेल्या १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय, उमरगा, तुळजापूर, कळंब, परांडा येथील उपजिल्हा रुग्णालय, लोहारा, वाशी, भूम, तेर, सास्तूर व मुरूम येथील ग्रामीण रुग्णालयात डोस मिळणार आहेत.