अणदूर : तुळजापूर तालुक्यातील ईटकळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राजश्री राहुल बागडे यांची तर उपसरपंचपदी फिरोज नजीर मुजावर यांची निवड झाली. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला.
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच्या ग्राम विकास पॅनलने पॅनेल प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस समर्थक महाविकास आघाडीचा धुव्वा उडवित एकूण सर्वच्या सर्व नऊ जागांवर एकतर्फी विजय मिळवित काँग्रेसच्या १५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला. ईटकळ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी असल्याने नूतन सरपंच म्हणून राजश्री राहुल बागडे यांची तर उपसरपंचपदी फिरोज नजीर मुजावर यांची एकमताने निवड झाली. यानंतर ग्रामस्थांनी व समर्थकांनी गुलालाची उधळण करून विजयोत्सव साजरा केला. यानंतर सरपंच राजश्री बागडे, उपसरपंच फिरोज मुजावर, अमोल पाटील, रंजना मुळे, नजीर शेख, सविता सोनटक्के, पद्माबाई लकडे, साहेबा क्षीरसागर, खातुनुबी मकानदार यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी उमेदवारांचा सत्कार, औक्षण करण्यात आले.
सर्वांना सोबत घेऊन गावचा विकास करू
जनतेनी आम्हाला कौल दिला आहे. त्यामुळे आता आमची जबाबदारी वाढली असून, जनतेचा विश्वासास तडा जाऊ देणार नाही. आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन गावचा विकास करू. भ्रष्टाचारमुक्त ग्रामपंचायत, शुद्ध पाणी, गावात सिमेंट रस्ते, बंदिस्त गटार, इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू करणे, पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करणे आदी कामे प्राधान्याने हाती घेतले जाणार असल्याचे पॅनल प्रमुख अरविंद पाटील यावेळी म्हणाले.