तुळजापूर : तालुक्यातील भातंब्री येथील २७ वर्षीय तरुणाने ग्रामपंचायतीच्या परिवर्तनासाठी पुढाकार घेत ग्राम विकास युवा पॅनेलच्या माध्यमातून पाच जागा बिनविरोध मिळविल्या. तसेच निवडणूक झालेल्या दोन्ही जागा ताब्यात घेण्यातही त्यांना यश आले. यामुळे या ग्रामपंचायतीचा कारभार आता तरुणांच्या हातात आला आहे.
तुळजापूर-अक्कलकोट या राज्यमहामार्गावर जवळपास ६७५ लोकसंख्येचे भातंब्री गाव आहे. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या सात आहे. ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हाल सहन करावे लागत आहेत. गावांतर्गत रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या सिंचन विहीर योजनेपासून शेतकरी वंचित आहेत. अशा अनेक समस्या गावात निर्माण झाल्याने गावातीलच एम.कॉम. शिक्षण घेतलेल्या रवी बंडगर (पाटील) या तरुणाने मागील पंचवार्षिक निवडणुकीत विरोधी बाकावर बसून गावातील अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्यावर विश्वास ठेवत ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी राहिले. या निवडणुकीत बंडगर यांच्या पॅनेलमधून सुनंदा बंडगर, सीताबाई सलगर, सुरेखा लोंढे, रवी बंडगर, गुणवंत बंडगर हे पाचजण बिनविरोध, तर कृष्णा लोंढे, निलावती कांबळे हे दोघे निवडणूक लढवून निवडून आले.
कोट.....
गावात बदल होणे गरजेचे होते. या माध्यमातून तरुणांना नवीन संधी मिळाली आहे. ग्रामपंचयातीचा कारभार सुरळीत सुरू झाल्यानंतर गावचा प्रमुख असलेला पाणीप्रश्न मार्गी लावला जाईल. यासोबतच अंतर्गत रस्ते, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिका, महिलांना उद्योग, व्यवसायात वाव मिळण्यासाठी बँकांच्या माध्यमातून अर्थसाहाय्य, प्रत्येक शेतकऱ्याला सिंचन वाढीसाठी मनरेगा योजनेच्या माध्यमातून सिंचन विहीर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- रवी बंडगर