उस्मानाबाद : आपल्या मोबाइलवर लॉटरी लागल्याचा मेसेज केव्हाही धडकू शकतो. किंबहुना तो आला असेलही. काहींना ई-मेलही आले असतील; मात्र थांबा. त्यांना प्रतिसाद देऊच नका. फिशिंग ई-मेल, फ्रॉड मेसेज पाठवून गंडविण्याचे प्रकार वाढले आहेत.
आपल्या मोबाइलवर आमिष दाखविणारे कॉल्स, मेसेज येणे हे नियमित प्रकार झाले आहेत; मात्र त्यास प्रतिसाद दिल्यानंतर आर्थिक फटका बसतो, हे अद्याप सर्वज्ञात नाही. त्यामुळे अनभिज्ञ नागरिक अशा फेक बाबींना बळी पडत आहेत. त्यातही विशेषत: ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. आता तर यात व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही मेसेज, व्हाईस मेसेज पाठवून ठगविण्याचे प्रकार घडताना दिसून येत आहे.
फिशिंग ई-मेल...
एखाद्या बनावट कंपनीच्या नावाने फिशिंग ई-मेल किंवा मेसेज पाठविले जातात. यातून बँक खातेदाराची माहिती, पासवर्ड, पिन चोरी केली जाते.
माहिती चोरी केल्यानंतर त्याआधारे बँक खात्यातील रक्कम ऑनलाइन पद्धतीने लंपास केली जाते. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगली पाहिजे.
ही घ्या काळजी...
१. सार्वजनिक ठिकाणी असलेली वायफाय सेवा शक्यतो वापरु नयेच. फोनची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करत रहावी.
कोणतेही पासवर्ड सतत बदलत रहावे. २. आपल्या मोबाइलवर आलेल्या अनोळखी, फेक ई-मेल किंवा मेसेजेसना प्रतिसाद देऊ नये. विशेषत: आमिष दाखविणाऱ्या कॉल, मेसेजेसना उत्तर देऊ नये.
३. ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घेतली पाहिजे. आपल्या मोबाइलमधील डाटा चोरीला जाणार नाही, हॅक होणार नाही, याचीही काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे.
वेबसाईटची सुरुवात एचटीटीपीएस पासून आहे का...
मोबाइलवर आलेल्या मेसेज किंवा ई-मेलमधील वेबसाईटवर क्लिक करून त्यात प्रवेश करण्यापूर्वी या वेबसाईटची सुरुवात एचटीटीपीएस या इंग्रजी अक्षरांपासून झाली आहे का, हे तपासले पाहिजे.
जर त्या मेसेज किंवा मेलमध्ये नमूद करण्यात आलेल्या वेबसाईटची सुरुवात वरील अद्याक्षरांपासून झालेली नसेल तर त्यावर क्लिक करणे टाळावे. अन्यथा फसवणुकीच्या मायाजालात आपण ओढले जाण्याची शक्यता वाढत जाते.
व्हाॅट्सअपवरूनही येऊ लागले बोगस मेसेज...
ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकारात यापूर्वी व्हॉट्सअपचा वापर फारसा केला जात नव्हता; मात्र आता यावरूनही बनावट मेसेजेस सुरू झाले आहेत. यात एक व्हाईस रेकॉर्डिंग येत आहे. त्यात आपण व्हॉट्सअपचा अधिकारी बोलत असून, तुमचा नंबर हा लॉटरी पद्धतीने पुरस्कारासाठी निवडला गेला आहे. आपण २५ लाख रुपयांचे बक्षीस लागले आहे, असे सांगण्यात येते, तसेच सोबत देण्यात आलेल्या मेसेजमधील क्रमांक सेव्ह करून त्यावर व्हॉट्सअपवरुन व्हाईस कॉल करण्यास सांगितले जात आहे. हा क्रमांक मुंबईच्या बँक अधिकाऱ्याचा असून, तुमच्या बक्षिसाची रक्कम त्यांच्याकडे जमा झाली आहे. ते मिळविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यास व्हाईस कॉल करण्याची सूचना केली जात आहे. यातून बँक खात्याची माहिती मिळवीत गंडविले जात आहे.