उमरगा : आठ दिवसांपासून हवामानात कमालीचा बदल झाला आहे. या बदललेल्या हवामनाचा परिणाम बालकांच्या आरोग्यावर झाला आहे. विशेषत: लहान मुले अतिसार आणि थंडी-तापाने त्रस्त झाली आहेत. त्यामुळे परिसरातील रूग्णालये फुल्ल असल्याचे दिसून येत आहे.शहर आणि तालुक्यातील मागील आठ दिवसांपासून ढगाळ वातावरणात गारवा व अधून-मधून पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. तापमानातील या चढ-उताराचा परिणाम शेकडो बालकांच्या आरोग्यावर झाला आहे. मागील पंधरा दिवसापूर्वी उष्णतेत वाढ झाल्याने बालकांना गोवर व कांजण्याच्या आजाराला सामोरे जावे लागले होते. आता वातावरणातील गारवा व पडलेला रिमझिम पाऊसामुळे अतिसार तसेच थंडी-तापाच्या रूग्णांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. शहरामध्ये सहा बालरूग्णालये आहेत. या सर्व रूग्णालयांमध्ये दिवसाकाठी २५० ते ३०० बालके उपचारासाठी दाखल होत आहेत. विशेषत: ९ महिने ते २ वर्ष वयोगटातील बाल रूग्ण अधिक आहेत. (वार्ताहर)
बालरुग्णालये फुल्ल
By admin | Updated: January 5, 2015 00:36 IST