उस्मानाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोविड-१९ लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी होऊन गडबड गोंधळ होऊ नये या दृष्टिकोनातून प्रत्येक लसीकरण केंद्रावर विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यास कोविड-१९ प्रतिबंधाच्या अनुषंगाने मिळणाऱ्या लसीचे प्रमाण हे सद्यस्थितीत लोकसंख्येच्या तुलनेत कमी असल्याने व लोकांना आता लसीचे महत्व पटल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्याच्या दृष्टिकोनातून व लसीसाठी येणाऱ्या नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन आणि सहकार्य व्हावे याकरिता १८ मे पासून होणाऱ्या लसीकरणासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रास एक संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. या संपर्क अधिकाऱ्यासोबत ग्रामसेवक, अंगणवाडी सुपरवायझर, ग्राम विस्तार अधिकारी, शिक्षक यांची नियुक्ती करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांनी गट विकास अधिकारी व संपर्क अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्या लसीकरण केंद्रावर दिवसभरात किती लसी दिल्या जाणार आहे? ही लस कोणाला दिली जाणार आहे? लस कोणत्या प्रकारची आहे? इत्यादी बाबतची माहिती या पथकाकडून नागरिकांना दिली जाणार आहे. तसेच सामाजिक अंतर ठेवून रांगेत उभे राहणे, त्यांना त्यांचा क्रमांक म्हणून चिट्ठी देणे, गर्दी न होऊ देणे, आवश्यक ते मार्गदर्शन करणे इत्यादी कामे या पथकामार्फत केली जाणार आहेत.
चाैकट...
हे आहेत संपर्क अधिकारी...
तालुका आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका महिला व बालविकास अधिकारी, उपअभियंता, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांची तालुकास्तरावर संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी त्यांच्या पथकासह लसीकरणाचे कामकाज पाहतील.