उस्मानाबाद : भुरभूर हजेरीनंतर दोन दिवस ब्रेक घेऊन तो आला... ध्यानीमनी नसताना रात्रीतून धो-धो बरसला... इतका उतरला की सगळीकडे पाणीच पाणी करून टाकले. विशेषत: भूम व परंडा तालुक्यात कहरच. माणकेश्वर मंडळामध्ये तर मुसळधार पावसाची नोंद झाली अन् इतर ११ मंडळांमध्ये अतिवृष्टीची. रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने जिल्ह्यात कोठेही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आवारपिंपरीत तीन पशुधन वाहून गेले.
अल्पकाळ विश्रांती घेतल्यानंतर वरुणराजाने जिल्ह्यात दमदार एन्ट्री केली आहे. शनिवारी दिवसभर उन होते. मात्र, सायंकाळी ढग एकत्र आले आणि रात्री बरसण्यास सुरुवात केली. मध्यरात्रीच्या वेळी पावसाचा जोर वाढला. संपूर्ण जिल्ह्यात पावसाने पाय पसरले. कुठे मध्यम तर कुठे जोरदार पाऊस झाला. रविवारी सकाळपर्यंत या पावसाची नोंद ५० मिमी इतकी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद ही परंडा तालुक्यात ९२.६० तर भूम तालुक्यात ९१.५० मिलिमीटर इतकी झाली आहे. त्यापाठोपाठ वाशी तालुक्यात ५७, तुळजापूर ४८, उमरगा ४२, लोहारा ३७, कळंब २७ तर उस्मानाबाद तालुक्यात २५ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे. हा पाऊस पुढील हंगामासाठी उपयुक्त ठरला असला तरी चालू खरीप हंगामातील काढणीला आलेल्या व अनेक ठिकाणी काढणी झालेल्या उडीद, मुगासाठी नुकसानकारक ठरला आहे. ही पिके आता पूर्णत: पाण्याखाली आहेत. तसेच भूम-परंडा भागात पावसासोबतच वाऱ्यानेही एन्ट्री केल्याने अनेक ठिकाणी ऊस आडवा झाला आहे. कांद्याचे कोठार समजले जाणाऱ्या तुळजापूर तालुक्यात लावण झालेल्या कांदा रोपांचे नुकसान झाले आहे.
तलाव फुटला, पशुधन वाहिले...
रात्रीच्या जोरदार पावसामुळे तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ मंडळात अतिवृष्टी नोंदली गेली. शिवाय, सलगरा मंडळात ५० मिमी पाऊस झाला. यामुळे देवसिंगा तुळ येथील पाझर तलाव फुटून त्याखालील १० हेक्टर्स शेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, परंडा तालुक्यातील आवार पिंपरी येथील श्रीराम नरुटे यांच्या दोन म्हशी व एक रेडकू पाण्यात वाहून गेले आहे.
इथे बरसला धो-धो...
भूमच्या माणकेश्वर मंडळात ११६.३ मिमीसह मुसळधार पाऊस झाला. तर परंडा मंडळात १०७.३ मिलिमीटर, आसू ८४.५, जवळा ९४.३, अनाळा ८५.५, साेनारी ९१.३ मिमी पाऊस झाला. भूम तालुक्यातील अंबी १०२.८, माणकेश्वर ११६.३, भूम ९४.३, ईट ८१.५, तर वालवडमध्ये ६२.८ मिमीसह अतिवृष्टी झाली. वाशी तालुक्यातील पारगाव ७८.५, तर तेरखेडा ६५.३ व तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ सर्कलमध्येही ७७.३ मिमीसह अतिवृष्टी नोंदली.
सरासरीच्या ८ टक्के रात्रीतून...
जिल्ह्यात रात्रीतून ५०.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाळ्यात उस्मानाबाद जिल्ह्यात ६०३ मिमी सरासरी पाऊस पडतो. या सरासरीच्या तुलनेत रात्री झालेल्या पावसाची नोंद पाहिली तर एका रात्रीतून ८ टक्के पाऊस झाल्याचे लक्षात येते.