शिराढोण : कळंब तालुक्यातील शिराढोण येथे गेल्या पाच वर्षांपूर्वी ढोरी नदीचे पाच कि. मी. अंतराचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम लेाकसहभागातून करण्यात आले होते. त्यामुळे सद्यस्थितीत कडक उन्हाळ्यातही या ठिकाणी मुबलक पाणीसाठा उपलब्ध असून, यामुळे हजारो हेक्टर क्षेत्राला लाभ झाला आहे.
त्यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी जि. प. उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, माजी खा. रविंद्र गायकवाड यांनी शेतकऱ्यांना लोकसहभागासाठी प्रोत्साहन देवून निधीही उपलब्ध करून दिला होता. शेतकऱ्यांनी देखील पाण्यासाठी गट तट विसरुन एकत्रित येत हे काम मार्गी लावले होते. जलसंधारणाच्या कामामुळे काटेरी झाडा-झुडपांनी व्यापलेली नदी सरळ, सुंदर झाली होती. नदीतील गाळ शेतकऱ्यांनी हलक्या जमिनीवर टाकल्याने या जमिनीची सुपिकताही चांगली वाढली. यामुळे शेतकऱ्यांना या खोलीकरणाचा दुहेरी फायदा झाला.
जलसंधारण कामाच्या अगोदर पावसाळा संपताच महिनाभरात ही नदी कोरडी पडत होती. परंतु जलसंधारणाचे काम झाल्यामुळे सध्या कडक उन्हाळयाचा एप्रिल महिना सुरु असतानाही नदी पात्रात मुकलक पाणी उपलब्ध आहे. या पाण्याामुळे पशु-पक्ष्यांची तहान भागत आहे. शिवाय, या परीसरातील जमिनीत पाणी मुरल्यामुळे या ठिकाणच्या जलस्त्रोतांना उन्हाळयात पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे नदीकाढच्या देान्ही बाजुच्या हजारो हेक्टर क्षेत्रावर हिरवळ पसरलेली आहे. जलसंधारणाच्या कामामुळे येथील हजारो हेक्टर क्षेत्र बारमाही बागायत झाले असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही चांगली वाढ झाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी पिकाला भरमसाट पाणी उपसा टाळून ठिबक सिंचन करुन उन्हाळयात कमी पाण्याचा वापर केल्याने पाणी टिकून आहे. याच शिवारातील इतर भागातील विहीरी तळाला गेल्या असल्या तरी जलसंधारण भागातील जलस्त्रोतांध्ये मुबलक पाणी असल्याने शेतकऱ्यांना जलसंधारणचे महत्व समजले आहे.
चौकट.........
ढोरी नदीचे जलसंधारणाचे काम करण्यासाठी अर्चनाताई पाटील यांनी गावात बैठक घेऊन ग्रामस्थांना प्रोत्साहित केले होते. जलसंधारणाच्या कामापूर्वी रबी पिकांनाही पाणी कमी पडत होते. पंरतु, आता अल्प पर्जन्यमान झाले तरी उन्हाळ्यात देखील मुबलक पाणीसाठा राहत आहे.
- किरण पाटील, शिराढोण