(फोटो : गुणवंत जाधवर १३)
उमरगा : तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून, मंगळवारी तर तब्बल ७० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले, शिवाय एका कोरोना बाधित वृद्धाचा मृत्यू झाला. त्यामुळे आत्तापर्यंत तालुक्यातील कोरोनाबधितांची संख्या २ हजार ७८३ झाली असून, ७१ कोरोनाबधितांचा मृत्यू झाला आहे.
उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या चंडकाळ येथील ६२ वर्षीय कोरोनाबाधित वृद्धाचा मंगळवारी मृत्यू झाला. ९ एप्रिल रोजी सदर व्यक्तीला दाखल करण्यात आले होते. उमरगा उपजिल्हा रुग्णालयातून ९ एप्रिल रोजी पाठवलेल्या ३४ स्वॅबचा अहवाल मंगळवारी आला. यामध्ये १० तर १० एप्रिल रोजीच्या स्वॅब अहवालात ५ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
मुरुम ग्रामीण रुग्णालयातून पाठवलेल्या १७ स्वॅबपैकी ४ व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारी घेण्यात आलेल्या ९ रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये २ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत.
तालुक्यातील ग्रामीण भागात मंगळवारी ९० रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये १६ व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, तसेच उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी घेण्यात आलेल्या १८७ रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये ३३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
सध्या उपजिल्हा रुग्णालयात १०६, ईदगाह कोरोना केअर सेंटरमध्ये २८, खासगी दवाखान्यात २३, मुरुम कोविड केअर सेंटरमध्ये ४७ तर होम आयसोलेशन मध्ये ५५ रुग्ण आहेत, याशिवाय इतर रुग्णालयांत काही रुग्ण रेफर केले आहेत.
कोट.....
सध्या तालुक्यात कोरोनाबधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सर्व कोविड रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन शासनदराने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्याच रुग्णालयाची आहे. शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने कोणी रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करू नये, अन्यथा कठोर कारवाई होईल.
- डॉ.अशोक बडे, वैद्यकीय अधीक्षक, उमरगा
चौकट.....
नवीन केंद्र कार्यान्वित; मात्र पाण्याची सोय नाही
उमरगा : तालुक्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. सध्या पाच कोविड सेंटर वर कोविड रुग्ण असून, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या तीनशेवर गेली आहे. येथील बहुतांश कोविड सेंटर फुल्ल झाली आहेत. मुरुम येथील कोविड केअर सेंटरमध्ये उमरगा येथील रुग्ण जाण्यास तयार होत नाहीत. यामुळे उमरगा येथील शिवाजी कॉलेज कोविड केअर सेंटर चालू करण्याचा निर्णय घेतला. या कोविड केअर सेंटरसाठी दोन वैद्यकीय अधिकारी व ४ इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना जेवण पुरविण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. मात्र, या कॉन्ट्रॅक्टमध्ये मिनरल पाणीपुरवठ्याचा समावेश नाही. कॉन्ट्रॅक्टरला याबाबत विचारले असता, जोपर्यंत पाणीपुरवठ्याची वर्क ऑर्डर मिळत नाही, तोपर्यंत पाणीपुरवठा करणार नाही, असे त्यांनी सांगितले. तहसीलदारांना याबाबत विचारले असता, जिल्हाधिकारी यांच्याकडून याबाबत आम्हाला सूचना नसल्याचे त्यांनी सांगितले.