उस्मानाबाद : कोरोना संसर्गास प्रतिबंध बसावा, याकरिता पोलीस दलाच्या वतीने धडक मोहीम राबविण्यात येत आहे. मागील सव्वा वर्षात विनामास्क, ट्रिप्पल सीट प्रवास, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे अशा नियम मोडणाऱ्या ११ हजार १६९ नागरिकांकडून सुमारे ४३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
जिल्ह्यात गतवर्षी एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली. या काळात कोरोना संसर्गास अटकाव बसावा, याकरिता शासनाने विविध नियम घालून दिले आहेत, परंतु अनेक नागरिक नियमांचे उल्लंघन करताना आढळून येत आहेत. अशा नागरिकांवर जिल्ह्यातील १८ पोलीस ठाणी व व वाहतूक शाखेच्या वतीने दंडात्मक कारवाया केल्या जात आहेत. हवेतून कोरोना संसर्ग फैलावू नये, यासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क, तसेच स्वच्छ रुमाल बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे. मागील सव्वा वर्षाच्या कालावधीत ५ हजार ९४ व्यक्तींविरुद्ध कारवाईचा बडगा उगारून त्यांच्याकडून २५ लाख ५१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर दुचाकीवरून दोनपेक्षा अधिक व्यक्ती, हेल्मेट व मास्क न घालणे अशा १ हजार ५०० व्यक्तींविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. या व्यक्तींकडून ७ लाख २३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर शहर वाहतूक शाखेच्या वतीने वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, ट्रिप्पल सीट प्रवास करणे, वाहनांना नंबर प्लेट नसणे, विना लायसन्स वाहन चालविणे, विना हेल्मेट वाहन चालविणे अशा ४ हजार ५७५ वाहन चालकांवर कारवाई करून १० लाख ८६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. पोलीस व वाहतूक शाखेच्या वतीने अद्यापही कारवाया केल्या जात असल्या, तरी नागरिक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
विनामास्क सर्वाधिक दंड
मागील सव्वा वर्षाच्या कालावधीत विनामास्क फिरणाऱ्या ५ हजार ९४ व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात आली. या व्यक्तींकडून प्रत्येकी ५०० प्रमाणे २५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
ट्रिपल सीट सुसाट
दुचाकीवर दोनपेक्षा अधिक व्यक्ती बसून प्रवास करण्यास मनाई आहे. असे असतानाही कोरोना काळातही दुचाकीवरून दोनपेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करताना आढळून येत आहेत. मागील सव्वा वर्षात अशा १ हजार ५०० व्यक्तीविरुद्ध कारवाया करून ७ लाख २३ हजार २०० रुपये दंड वसूल केला. वाहतूक शाखेकडूनही ६९९ ट्रिपल सीट वाहन चालकांवर कारवाई करून १ लाख ३९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कोट...
कोरोना काळात वाहन चालकांना शिस्त लागावी, यासाठी शहरातील मध्यवर्ती बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, देशपांडे स्टँड, बार्शी नाका परिसरात कारवाया केल्या जात आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर यापुढेही कारवाया केल्या जाणार आहेत. वाहन चालकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करावे.
इक्बाल सय्यद, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा
ट्रिपल सीट २१९९
विनामास्क ५०९४
विना हेल्मेट १३०
नो पार्किंग १५३९
मोबाइलवर बोलणे ६८३
विनानंबर प्लेट १,०८१
विना लायसन्स ४४३