उस्मानाबाद : दिनांक १५ जानेवारी रोजी जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. तीन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी नामनिर्देशन दाखल करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सोमवारी दिवसभरात ३०७ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत.
जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दिनांक २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. दरम्यान, २३ डिसेंबर रोजी एकही अर्ज दाखल झालेला नव्हता. त्यानंतर २४ डिसेंबर रोजी २५ जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली होती. तर २५, २६, २७ डिसेंबर अशी तीन दिवस सुटी आल्याने सोमवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची सकाळपासून लगबग सुरु होती. उस्मानाबाद तालुक्यातून ७६, तुळजापूरमधून ७०, उमरगातून ३०, लोहारातून २२, कळंबमधून ५१, वाशीतून २२, भूममधून ६, परंडा तालुक्यातून ३० असे एकूण ३०७ नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.