उस्मानाबाद : कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आलेले तीन कोविड केअर सेंटर तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. कोविड केअर सेंटर बंद झाल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
गतवर्षी जून महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. रुग्णांना बेड अपुरे पडत होते. आरोग्य यंत्रणेवर ताण येत होता. रुग्णांची गैरसोय टाळण्याकरिता प्रशासनाकडून जिल्ह्यात ५८ कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले होते. या केंद्रावर रुग्णसेवेसाठी तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टर, परिचारिका, लॅब टेक्निशियन, वाॅर्डबॉयची नियुक्त केली होती. जिवावार उदार होऊन कोविड महामारीच्या काळात दिवस-रात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली. ऑक्टोबर महिन्यात रुग्ण संख्या कमी होताच पुन्हा यातील काही सेंटर बंद करण्यात आले. काही कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागले. मार्च महिन्यात रुग्ण संख्या वाढताच पुन्हा कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना रुजू करण्यात आले. दुसऱ्या लाटेतही कोविड कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली. मात्र, जून महिन्यात दुसरी लाट ओसल्यानंतर रुग्णांची संख्या कमी हाेताच, जून व जुलै महिन्यात काही सेंटर बंद करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी आता पुन्हा तीन कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले आहेत. या केंद्रावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. त्यामुळे कोविडसारख्या महामारीत सेवा बजावलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना ११ महिन्यांचे कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
हे सेंटर झाले बंद...
नळदुर्ग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, बेनीतुरा मुरुम, येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह, लोहारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह या तीन ठिकाणी सुरू असलेले कोविड केअर सेंटर तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या आहेत.
साडेचारशे कंत्राटी कर्मचारी कार्यमुक्त
कोरोना काळात डॉक्टर, परिचारिका, लॅब टेक्निशियन, वॉर्डबॉय असे एकूण ६९९ कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. दुसरी लाट ओसरल्यानंतर रुग्ण कमी झाल्याने यातील मागील दाेन महिन्यात टप्प्या टप्प्याने ४४९ कर्मचारी कार्यमुक्त करण्यात आले आहेत. सध्या सुरू असलेले ७ कोविड केअर सेंटर, २ डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, ३ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल या ठिकाणी सुमारे २५० कर्मचारी कार्यरत आहेत.
या ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार
उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय, तुळजापूर व उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, कळंब, परंडा उपजिल्हा रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हेल्ट सेंटर, उस्मानाबाद येथील पॉलिटेक्निक मुलींचे वसतिगृह, उमरगा येथील ईदगाह मैदान, भूम येथील शासकीय मुलांचे वसतिगृह, परंडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह, कळंब येथील शास. औद्योगिक प्र. संस्था, वाशी येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे मुलींचे वसतिगृह या ठिकाणी सुरू असलेल्या सीसीसी कोविड रुग्णांकरिता सुरू आहेत.