उस्मानाबाद : कोरडवाहू असलेल्या जिल्ह्यात सिंचनाचे प्रमाण वाढावे याकरिता शासनाच्या वतीने सौर ऊर्जावर चालणारे कृषीपंप देण्याची योजना अंमलात आणली आहे. यात शेतकऱ्यांना केवळ पाच टक्के रक्कमेत पंप मिळणार आहेत. जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांना सौरऊर्जा पंप मिळणार असल्याचे महावितरणचे अधीक्षक अभियंता पापडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सौर पंप वाटप करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे.निसर्गाच्या अनियमितपणामुळे उत्पन्नावर परिणाम होत असल्याने आत्महत्या होत असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या सिंचन धडक विहिरींचा लाभ घेणारे शेतकरीही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. योजनेकरिता शेतकऱ्याकडे पाच एकरापेक्षा अधिक शेती नसावी. शिवाय सिंचनाकरिता विहीर आवश्यक आहे. योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना केवळ पाच टक्के रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना परवडणारी आहे. यामुळे योजना यशस्वी होणार आहे. या योजनेत केंद्र शासन ३0 टक्के, राज्य शासन पाच टक्के व शेतकरी पाच टक्के यातून गोळा झालेल्या रकमेतून कृषिपंप मिळणार आहे. यामुळे ही योजना शेतकऱ्यांकरिता लाभाची ठरणारी आहे. उस्मानाबादसाठी पहिल्या टप्प्यात १९० शेतकऱ्यांना सौरपंपाचे उदिष्ट आहे. लाभार्थी निवडीसाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातूनच लाभार्थी निश्चित केले जातील. (प्रतिनिधी) लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हा पातळीवर समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, सदस्य सचिव अधीक्षक अभियंता महावितरण, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा व महाऊर्जाचे अधिकारी या समितीचे सदस्य राहणार आहे. मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत ५८० सौरपंप शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. यात बीडसाठी दोनशे तर उस्मानाबाद व जालन्यासाठी प्रत्येकी १९० असे पंप मंजूर झाले आहेत.
जिल्ह्यासाठी १९० सौरऊर्जा पंप मंजूर
By admin | Updated: August 9, 2015 00:27 IST