येडशी : शासनमान्य जनता कोविड विलगीकरण कक्ष यांच्यावतीने रविवारी येथे मोफत रॅपिड अँटिजन तपासणी शिबिर घेण्यात आले. यात ६३ जणांची तपासणी केली असता १५ जण कोरोनाबाधित आढळले. यातील ६ जण जनता विलगीकरण कक्षात पुढील उपचारासाठी दाखल झाले आहेत.
आंब्याचे नुकसान
(फोटो)
उमरगा : तालुक्याच्या काही भागात शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला. शिवाय, वाऱ्यामुळे झाडावर लगडलेले आंबे खाली पडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
गुटखा विक्री सुरूच
कळंब : राज्यात गुटखाबंदीचे आदेश असले तरी शहरासह तालुक्यात मात्र सर्रास याचे उल्लंघन होत आहे. सध्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश दिले असले तरी गुटख्याची मात्र चोरून विक्री सुरूच आहे.
‘कुत्र्यांना आवरा’
उस्मानाबाद : शहराच्या विविध भागात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रात्रीच्या वेळी ही कुत्रे पादचारी तसेच वाहनधारकांच्या अंगावर धावून जात आहेत. यामुळे पालिकेने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
दुभाजकाची गरज
उस्मानाबाद : शहरातील प्रमुख रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यामुळे वाहने सुसाट धावत असून, रस्त्यावर कुठेही गतिरोधक नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे.