ठाणे: ठाण्यातील साकेत रोड परिसरात सुमारे पाच कोटींच्या व्हेल जातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्रीसाठी आलेल्या नितीन मोरेल याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी मंगळवारी दिली. त्याच्याविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात वन्य प्राणी संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
ठाण्यातील साकेत रोड परिसरात एक व्यक्ती व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दीपक घुगे यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे २० जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान साकेत कॉम्पलेक्सकडून कळवा नाक्याकडे येणाऱ्या रस्त्यावर राबोडी भागात सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड आणि सहायक पोलीस निरीक्षक अब्दुल मलिक यांच्या पथकाने त्या भागात सापळा रचला. त्यावेळी हातात पिशवी घेऊन त्या भागातून पायी जाणाऱ्या संशयास्पद व्यक्तीची पोलीस पथकाने झडती घेतली. त्याच्याकडे व्हेल माशाच्या उलटीचे तुकडे आढळले.
सखोल चौकशीत नितीन मोरेल असे स्वत:चे नाव सांगून पुण्यातील दिघी भागातून तो आल्याचे त्याने सांगितले. नाशिक येथून एका व्यक्तीकडून ही व्हेल माशाची उलटी त्याने आणली होती. किमान ८० लाखांमध्ये त्याची तो विक्री करणार होता. सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठी या अंबरग्रीसचा वापर केला जातो. त्याच्याकडून पाच किलो ४८ ग्रॅम वजनाची ही उलटी जप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या अंबरग्रीसची किंमत पाच कोटींच्या घरात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.