लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर. थर्टी फर्स्टसाठी पोलिसांनी मजबुत व्यूहरचना करून मंगळवारी दिवसभर आणि पहाटेपर्यंत कारवाई करून मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या ५९२ वाहन चालकांवर कारवाई करून थंडीत त्यांना घाम फोडला. पोलिसांनी कडक बंदोबस्त लावल्यामुळे नवे वर्ष साजरे करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या युवकांनी शांततेने नव्या वर्षाचे स्वागत केले. त्यामुळे शहरात कोणतीही मोठी घटना किंवा अपघात झाला नाही.नव्या वर्षाचे स्वागत करताना अनेकदा काहीजण धुडगूस घालतात. अशा व्यक्तींचा बंदोबस्त करणे पोलिसांसाठी तारेवरची कसरत ठरते. यामुळे पोलिसांनी शहराच्या कानाकोपऱ्यात कडेकोट बंदोबस्त लावला होता. पोलिसांची वाहने गस्त घालत होती. मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पथक तैनात केले होते. पोलिसांना वाहन चालकांनी तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यामुळे अनेकांनी घरीच बसून नववर्षाचे स्वागत करण्याला पसंती दिली. परंतु मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या ५९२ जणांवर कारवाई केली. मागील वर्षी ३१ डिसेंबरला १०६४ वाहनचालकांवर ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. बहुतांश मद्यपी वाहनचालक रस्त्यावर न उतरल्यामुळे शहरात कोणताही अपघात झाला नाही. पोलीस आयुक्त डॉ. भुषणकुमार उपाध्याय, सह आयुक्त रवींद्र कदम यांनी रात्री उशिरापर्यत रस्त्यावर उतरून नागरिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ड्रंक अँड ड्राईव्हची सर्वाधिक ८५ कारवाई वाहतूक शाखा कामठी झोनने केली. त्यानंतर इंदोराने ८०, लकडगंज ६०, एमआयडीसी ६३, सोनेगाव ४३, सीताबर्डी ५०, सदर ४८, कॉटन मार्केट ५९, सक्करदरा ५६, अजनीत ४८ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. पोलिसांनी असामाजिक तत्वांविरुद्ध अभियान राबविले होते. अवैध धंद्याशी निगडीत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई सुरु केली होती. त्यांना सक्त ताकद देण्यात आली होती. यामुळे बहुतांश अवैध धंदे चालविणारे संचालक दोन-तिन दिवसांपासून शांत झाले होते.नागरिकांचे मानले आभारपोलीस आयुक्त डॉ. भुषण कुमार उपाध्याय यांनी नव्या वर्षाचे स्वागत करताना पोलिसांना सहकार्य करण्यासाठी नागरिकांचे आभार मानले आहेत. नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे पोलिसांचे काम सोयीस्कर झाले असून नागरिकांनी भविष्यातही अशा प्रकारचे सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
नागपुरात पोलिसांनी थंडीत फोडला मद्यपींना घाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 22:19 IST
थर्टी फर्स्टसाठी पोलिसांनी मजबुत व्यूहरचना करून मंगळवारी दिवसभर आणि पहाटेपर्यंत कारवाई करून मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या ५९२ वाहन चालकांवर कारवाई करून थंडीत त्यांना घाम फोडला.
नागपुरात पोलिसांनी थंडीत फोडला मद्यपींना घाम
ठळक मुद्दे५९२ वाहनचालकांवर कारवाई : पहाटेपर्यंत होते पोलीस सक्रिय