औरंगाबाद : डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार सोडला. ते गुरुवारी भंडारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदाची सूत्रे घेणार आहेत. दरम्यान, सायंकाळी जि.प. प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींच्या वतीने त्यांना सपत्नीक समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. अवघ्या ३२ व्या वर्षी जिल्हाधिकारीपदावर विराजमान होणारे डॉ. अभिजित चौधरी हे १५ जानेवारी २०१५ रोजी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर विराजमान झाले होते. जवळपास दीड वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात अनेकदा त्यांना कठोर निर्णयही घ्यावे लागले. नियमबाह्य कामांसाठी आग्रह धरणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्यांना ‘हे काम करणे शक्य नाही’, अशा संयमी भाषेत सांगून समजूत घातली. प्रशासनावर त्यांचा वचक होता. फायलींवर चुकीच्या टिपण्या लिहिणे किंवा हस्तलिखितामध्ये फाईल सादर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांनी शिस्त लावली. या सर्व त्यांच्या कार्यप्रणालीचा अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी तसेच सदस्यांनी निरोप समारंभात आवर्जून उल्लेख केला. जि.प.च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभाला डॉ. अभिजित चौधरी हे सपत्नीक उपस्थित राहिले. यावेळी व्यासपीठावर जि.प.चे अध्यक्ष श्रीराम महाजन, उपाध्यक्ष दिनकर पवार, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, अजय जोशी, बांधकाम सभापती संतोष जाधव, समाजक ल्याण सभापती शीला चव्हाण, सदस्य रामदास पालोदकर, दीपक राजपूत, पुष्पा जाधव, मुख्य वित्त व लेखाधिकारी उत्तमराव चव्हाण, शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल, विविध कर्मचारी संघटनांचे नेते, कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. अभिजित चौधरी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, जिल्हा परिषदेत काम करत असताना कसे दिवस गेले ते समजलेच नाही. अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी आणि सदस्यांचे मला चांगले सहकार्य मिळाले. ४ जेव्हा केव्हा जि.प.च्या सभा व्हायच्या. त्यानंतर ‘अधिकाऱ्यांना धारेवर धरले’ या आशयाच्या वर्तमानपत्रात बातम्या यायच्या. माझे एकच म्हणणे आहे की, चुकीचे काम करणारे अधिकारी- कर्मचाऱ्यांना तुम्ही घाम फोडायचे; पण जे चांगले काम करतात त्यांच्या पाठीवरही शाबासकीची थाप मारण्यास कुचराई करू नका. ज्यामुळे ते चुकीचे काम करणार नाहीत. आणखी जोमाने चांगले काम करतील.
जि.प.चे ‘सीईओ’ झाले कार्यमुक्त
By admin | Updated: June 29, 2016 01:01 IST