औरंगाबाद : अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांना मारहाण करून अँटी करप्शन विभागाकडे खोट्या तक्रारी दाखल करण्याची धमकी देणाऱ्या संभाजी डोणगावकर याचे जि.प. सदस्यत्वच रद्द करण्यात यावे, अशी मागणी आज मंगळवारी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली. तेव्हा आयुक्त डॉ. दांगट यांनी डोणगावकरविषयी तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांना दिले. या घटनेच्या निषेधार्थ उद्या बुधवारी जि.प. मुख्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये लेखणीबंद आंदोलन करण्याचा इशारा अधिकारी-कर्मचारी संघटनांनी दिला आहे. या घटनेचे परिणाम आज दिवसभर जिल्हा परिषद मुख्यालयात दिसून आले. दुपारी मुख्य वित्त व लेखाधिकारी उत्तम चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, मंजूषा कापसे, अजय जोशी, राजपत्रित अधिकारी महासंघाचे सरचिटणीस रत्नाकर पेडगावकर, कार्यकारी अभियंता पवार, गायकवाड, शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल, कृषी अधिकारी आनंद गंजेवार, समाजकल्याण अधिकारी डॉ. सचिन मडावी, राजेंद्र खाजेकर, कर्मचारी महासंघाचे निमंत्रक संजय महाळंकर आदींसह अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी द्वारसभा घेतली व घडलेल्या घटनेचा निषेध केला.त्यानंतर अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांची भेट घेतली. दांगट म्हणाले की, जि.प. सदस्य डोणगावकर याचे केवळ सदस्यत्वच रद्द करून चालणार नाही, तर त्याला भविष्यात कोणतीही निवडणूक लढविता येणार नाही, याबाबतही शासनाकडे शिफारस करू. नियमबाह्य कामांसाठी संभाजी डोणगावकर याने आतापर्यंत प्रत्येक अधिकाऱ्याला धमकावले आहे. जि.प. सदस्यपदी निवडून आल्यापासून त्याचा हा नित्यक्रम आहे, ही बाब शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा आयुक्त म्हणाले की, ज्या ज्या अधिकाऱ्यांना डोणगावकर याने धमकावले असेल, तसा सविस्तर अहवाल सादर करा, आपण त्याचे सदस्यत्व रद्द करणे तसेच भविष्यात त्याला निवडणूक लढण्यास अपात्र करण्याविषयी शासनाकडे शिफारस करू.अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांनाही निवेदन सादर केले. पोलीस आयुक्तांनी तात्काळ क्रांतीचौक ठाण्याचे निरीक्षक कोडे यांना संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अहिरे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह सिग्मा हॉस्पिटलमध्ये बेदमुथा यांचा जबाब घेण्यासाठी गेले. रात्री उशिरापर्यंत डोणगावकर विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.दरम्यान, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे सरचिटणीस प्रदीप राठोड यांनी या घटनेचा निषेध केला; परंतु उद्याच्या काम बंद आंदोलनात सहभागी न होण्याचा मनोदय व्यक्त केला. कर्मचाऱ्यांवर जेव्हा असे हल्ले झाले तेव्हा एकाही अधिकाऱ्याला दखल घ्यावी, असे का वाटले नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
जि.प.त आज लेखणीबंद
By admin | Updated: August 10, 2016 00:27 IST