औरंगाबाद : आर्थिक वर्ष संपत आले तरी राज्य सरकारने संपूर्ण ग्रँट न दिल्यामुळे जिल्हा परिषदेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन अद्याप अदा करण्यात आलेले नाही. जिल्ह्यातील निम्म्या शिक्षकांना येत्या दोन-तीन दिवसांत वेतन अदा होणार असले तरी कर्मचाऱ्यांना मात्र हा महिना वेतनाविनाच काढावा लागण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने या वर्षीचा संपूर्ण वेतन ग्रँट अद्याप दिलेला नाही. निधी नसतानाही कोषागार कार्यालय (ट्रेझरी) वर्षभर पगार बिले मंजूर केली जातात; परंतु आर्थिक वर्ष संपताना मात्र संपूर्ण ग्रँट वितरित होणे आवश्यक असते. त्यामुळे ट्रेझरीने जिल्हा परिषदेची फेब्रुवारी महिन्याची वेतन बिले नामंजूर केली आहेत. बिले नामंजूर झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांचे वेतन अद्याप झालेले नाही. शिक्षक सेनेचा आंदोलनाचा इशारागटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून चुकीची पगार बिले सादर झाल्यामुळे वित्त विभागाने वेतनाची पूर्ण तरतूद केली नाही. प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे शिक्षकांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पवार, सदानंद माडेवार, संतोष आढाव, प्रभाकर पवार, प्रभाकर गायकवाड यांनी केला आहे.निधी वितरणात फेरफार करणाऱ्याविरुद्ध कारवाईची मागणी करीत आंदोलनाचा इशारा सेनेने दिला आहे.
निधी मंजुरीअभावी जिल्हा परिषदेचे कर्मचारी वेतनाविना
By admin | Updated: March 27, 2015 00:43 IST