औरंगाबाद : संपूर्ण देशात जेथे सर्वाधिक देशभक्ती दिसून येते, असे महाराष्ट्र राज्य आहे. येथील ही देशभक्तीची शक्ती संपूर्ण देशाला मजबूत करीत आहे. संस्कृती, परंपरा कायम राहिली पाहिजे. युवकांनी मी भारतीय आहे असा विचार करावा आणि देशाला मजबूत करावे, असे आवाहन अ.भा. दहशतवादविरोधी आघाडीचे अध्यक्ष आणि युवक काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मनिंदरजितसिंग बिट्टा यांनी केले.देवगिरी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट स्टडी येथे मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बिट्टा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी प्रदीप चव्हाण, मोहन सावंत, अविनाश येळीकर, संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांची उपस्थिती होती. यावेळी बिट्टा म्हणाले, कोणी डॉक्टर बनण्यासाठी, तर कोणी इंजिनिअर बनण्यासाठी शिक्षण घेत आहे; परंतु जे शिक्षण घेत आहोत, त्यातून देशाचे नाव संपूर्ण जगात कसे होईल, याचा विचार करावा आणि त्या दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. युवकांनी देशाचा इतिहास वाचला पाहिजे. आजच्या पिढीसाठी काय काय केले आहे, हे त्यातून कळेल. देशाला दहशतवादापासून कसे मुक्त करायचे, हा आज सगळ्यात मोठा प्रश्न आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले राजकीय लोक आणि आजचे राजकीय लोक यांच्या विचारसरणीत बदल झालेला दिसतो; परंतु सगळेच वाईट नाहीत, असे ते म्हणाले. प्रारंभी शहीद जवानांच्या नातेवाईकांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी घोषणांनी संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले होते.सीमा सुरक्षेचा प्रश्नचीन, बांगलादेश, पाकिस्तान देशात घुसखोरी करीत आहेत. त्यामुळे देशाच्या सीमा सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, तसेच दहशतवाद्यांना सहा महिन्यांच्या आत मृत्युदंड अथवा जन्मठेप सुनावण्यात यावी, यासाठी दहशतवादविरोधी लष्करी न्यायालय स्थापन करण्याची गरज आहे. जे दहशवाद्यांना मदत करतील, त्यांनाही यानुसारच शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याची माहिती पत्रकार परिषदेत बिट्टा यांनी दिली. आंदोलकांनी आपल्या कार्यातच राहिले पाहिजे. आंदोलक राजकारणात आले तर काय होते हे दिसून आले आहे. काँग्रेस आपली आई असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
युवकांनी देशाला मजबूत करावे
By admin | Updated: September 24, 2014 01:06 IST