औरंगाबाद : १२ वर्षीय मुलाचा ओढ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू होऊन १२ तासही उलटत नाहीत, तोच सातारा परिसरातील डोंगरावरील तलावात १७ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
जवाहर कॉलनीतील काही मित्र संकल्प वनराई, सातारा परिसरातील डोंगरावर सकाळी फिरण्यासाठी गेले होते. सातारा डोंगरावरील एका छोटेखानी तलावात हे मित्र पोहण्यासाठी उतरले. यातील लखन ईश्वर पवार (१७, रा. जवाहर कॉलनी, चेतक घोड्याजवळ, मूळगाव शिंदे टाकळी, ता. सेलू, जि. बीड) हा पोहता येत नसल्यामुळे तलावाच्या कडेलाच पाण्यात उतरला होता. कडेला पोहत असतानाच नजरचुकीने तो खोल पाण्यात गेला व बुडाला. घाबरलेल्या सोबतच्या मुलांनी आरडाओरड केली. ही माहिती सातारा पोलीस आणि अग्निशमन दलास देण्यात आली. अग्निशमन पथक तेथे येऊन लखनला बाहेर काढेपर्यंत उशीर झालेला होता. सातारा पोलिसांनी लखन यास घाटी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.
अग्निशमन पथकातील मोहन मुंगसे, लक्ष्मण कोल्हे, संग्राम मोरे, शिवसंभा कल्याणकर, पंकज भालेकर, मयूर कुमावत, शुभम आहेरकर, शेख आसेफ यांनी लखनचा मृतदेह बाहेर काढला. सातारा पोलीस ठाण्याचे पीएसआय मारुती दासरे, पोलीस कर्मचारी सुनील लोंढे, राम जायभाये, सोनवणे यांनी त्याला घाटीत नेले. सातारा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार गव्हांदे पुढील तपास करीत आहेत.