उस्मानाबाद : शैक्षणिक व कृषी कर्ज मिळत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थी व नागरिकांकडून येत आहेत. कर्ज मागणीसाठी अर्ज आल्यास ते तात्काळ मंजूर करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सर्व बँकांना दिले आहेत. कर्ज वाटप, गारपीट व विविध शासकीय योजनांचे अनुदान देण्यास टाळाटाळ करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेविषयी डॉ. नारनवरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून बँकेच्या कामकाजाविषयी असमाधान व्यक्त करून त्यांना पिवळे कार्ड दिले.तसेच यापुढे कामकाज सुधारण्याचे निर्देश दिले. पीक कर्ज व शैक्षणिक कर्जाचा आढावा घेतला. अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक भीमराव दुपारगुडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, सहकार निबंधक कार्यालयाचे अधिकारी, बँकेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.पीक कर्ज आणि शैक्षणिक कर्ज मंजूर करण्याबाबत जिल्हा व्यवस्थापकांनी त्यांच्या सर्व बँक व्यवस्थापकांना याबाबत सूचना देण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हा बँकेने गारपीट अनुदान, विविध शासकीय योजना यांचे अनुदान देताना कोणतीही कपात करता कामा नये. तसे आढळल्यास कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पीक कर्ज विमा भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. सर्व बँकांनी शेतकऱ्यांना विमा भरण्यासाठी साह्य करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. पीक कर्ज वाटपात पन्नास टक्केपेक्षा कमी उद्दिष्टपूर्ती झाल्यास संबंधित बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी अग्रणी बँक व्यवस्थापकांना दिले. सर्व बँकांनी त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीचे तीन दिवसात निराकरण करावे आणि त्यांचा अहवाल सादर करण्याचे आदेशही डॉ. नारनवरे यांनी दिले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेला येलो कार्ड
By admin | Updated: July 23, 2014 00:33 IST