हिंगोली/कळमनुरी : जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सवास सुरूवात झाली असून यंदा ११०५ गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. यातील ३४५ ठिकाणी ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. हिंगोली शहर ठाणे हद्दीत ९० गणेश मंडळ स्थापन झाले आहेत. ग्रामीण हद्दीत ४६ गणेश मंडळांपैकी ३८ ठिकाणी ‘एक गाव एक गणपती’ आहे. कळमनुरी पोलिस ठाण्यातंर्गत ७६ ठिकाणी श्रींची स्थापना करण्यात आली आहे. त्यात शहरात १९ तर हद्दीतील आखाडा बाळापूर शहरात १९ व हद्दीत ५७ गणपती बसविण्यात आले. ‘एक गाव एक गणपती’ तालुक्यात ९६ व एकूण १८८ गणपती बसविण्यात आले. जास्तीत जास्त ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबविला जावा, यासाठी पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्षांनी पोलिस ठाण्यात बैठक घेऊन त्यांना आवाहन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळून ९६ ठिकाणी एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबविण्यात आला. सार्वजनिक सण, उत्सव रचनात्मक पद्धत व शांततेने साजरे करण्याला महत्व आहे. तालुक्यातील फक्त दोन ग्रामपंचायती वगळता सर्वच गावे तंटामुक्त झाली आहेत. यावर्षी ही दोन्ही गावांचे मूल्यमापन झाले असून, दोन्ही गावे तंटामुक्त होतील, असा आशावाद पोलिसांनी व्यक्त केला. दोन्ही पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावात तंटामुक्त समित्या कार्यरत असून, या समित्यांचे कार्य चांगले असल्याचाच परिपाक आहे. गाव पातळीवर तंटे होवू नयेत, गावात शांतता, जातीय व धार्मिक सलोखा कायम रहाव, राजकीय व सामजिक सामंजस्य सुरक्षिततेची भावना नागरिकांत निर्माण व्हावी, यासाठी तंटामुक्त समित्यांचे कार्य सुरू आहे. आगामी सण, उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन पोनि रविकांत सोनवणे, सपोनि पी.एस.कच्छवे यांनी केले आहे. पोलीस अधीक्षक एन.अंबिका यांनी जिल्ह्यातील १३ ठाण्यांना भेटी देऊन सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना एकात्मता व सामाजिक सलोखा कायम राखण्याबाबत मार्गदर्शन केले होते. तसेच महत्वाच्या ठिकाणी शांतता समितीच्या बैठका घेऊन संबंधित गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सुचनाही दिल्या. त्यानुसार जिल्हाभरात ११०५ गणेश मंडळे यंदाच्या उत्सवात सहभागी झाले असून, ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यासाठी ३४५ गावांनी पुढाकार घेतला आहे. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
यंदा ३४५ गावांत ‘एक गणपती’
By admin | Updated: August 31, 2014 00:15 IST