औरंगाबाद : यवतमाळ जिल्हा परिषदेतील नोकरभरतीचा पेपर फुटी प्रकरणात औरंगाबाद पोलिसांनी तेथील जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांचा लॅपटॉप जप्त करून आणलेला आहे. या लॅपटॉपची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार असून, त्यातील हार्ड डिस्क हैदराबाद येथे पाठविण्यात येणार आहे.याविषयी प्राप्त माहिती अशी की, यवतमाळ जिल्हा परिषदेतर्फे २ ते २२ नोव्हेंबरदरम्यान, विविध पदांच्या नोकरभरती प्रक्रियेअंतर्गत परीक्षा घेण्यात येणार होती. या परीक्षेच्या एक दिवस आधीच उत्तरपुस्तिकाची (अॅन्सर की) उमेदवारांना विक्री केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मोठ्या शिताफीने या रॅकेटचा पर्दाफाश करीत विक्रीकर निरीक्षक मकरंद मारुती खामणकर, दादासाहेब राधे वाडेकर, परभणी आरटीओ कार्यालयातील लिपिक पोपट कराळे, भागीनाथ साहेबराव गायके, मध्यवर्ती बँकेतील लिपिक विनोद दत्तात्रय वरकड यांच्यासह ११ जणांना अटक केली होती. पोलिसांच्या या कारवाईमुळे ही नोकरभरती स्थगित करण्यात आली आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी यवतमाळचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्याकडे होती. त्यांच्याच कस्टडीमध्ये प्रश्नपत्रिका असतात. त्यामुळे त्यांच्याशिवाय प्रश्नपत्रिकेची माहिती अन्य कोणत्याही अधिकाऱ्यास नसताना उत्तरपुस्तिका बाहेर कशी आली, असा प्रश्न पोलिसांना पडला. त्यामुळे त्यांनी महिवाल यांचा लॅपटॉप जप्त केला. पोलिसांनी महिवाल यांची चौकशीही केली आहे.
यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या लॅपटॉपची होणार फॉरेन्सिक तपासणी
By admin | Updated: December 24, 2014 01:03 IST