कळंब : तालुक्यातील येरमाळा येथे गुरूवारी श्री येडेश्वरी देवीच्या यात्रा उत्सवाची पारंपरिक पध्दतीने मोठ्या उत्साहात सांगता झाली. यानिमित्त आमराईत पालखीची महापूजा व घुगरी महाप्रसादाचे वाटप झाल्यानंतर भाविकाच्या ‘आई राजा उदो उदो’च्या गजरात पालखीचे आमराईतून मंदिराकडे प्रस्थान झाले. यावेळी विविध ठिकाणाहून हजारो भाविक उपस्थित होते. येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पार्णिमा यात्रेनिमित्त गेल्या पाच-सहा दिवसांपासून विविध कार्यक्रम पार पडले. यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक यात्रा उत्सवात सहभागी झाले होते. रविवारी डोंगरावरील मुख्य मंदिरातून गावालगतच्या आमराईत देवीच्या पालखीचे आगमन झाले होते. यानंतर दररोज आमराईत देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागत होत्या. चार दिवसांच्या मुक्कामानंतर गुरुवारी पालखीचे मुख्य मंदिराकडे प्रस्थान झाले. तत्पूर्वी आमराईत पालखी महापूजा करण्यात आली. यानंतर घुगरी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. गुरूवारी दुपारी चार वाजेच्या सुमारस आमराईतून ‘येडेश्वरी देवीचा उदो उदो’ असा जयघोष करीत पालखीचे सवाद्य मिरवणुकीत मंदिराकडे प्रस्थान झाले. यावेळी गावातील असंख्य भाविकांनी पालखीला पाणी घालून, प्रसाद देऊन निरोप दिला. (वार्ताहर)
येडेश्वरीची पालखी आमराईतून मंदिराकडे
By admin | Updated: April 10, 2015 00:26 IST