औरंगाबाद : औरंगाबादेतील अभियंत्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. आम्ही निर्माण केलेले सॉफ्टवेअर ४७ देशांत चालते. आम्ही सॉफ्टवेअरला आंतरराष्ट्रीय पेटेंटदेखील मिळविले आहे. टिकेट पुनर्विक्री क्षेत्रातील सर्व उत्पादनांमध्ये जगात आमचे स्थान पहिल्या क्रमांकाचे आहे. म्हणून मागील आठवड्यामध्ये आमची कंपनी ‘ई बे’ या अमेरिकी कंपनीने संपादित केली आहे. आम्ही सध्या ‘ई बे’ कंपनीचा एक भाग झालो आहोत, असे प्रतिपादन टिकेट युटिल्स कंपनीचे संचालक व संस्थापक मुक्तक जोशी यांनी केले. औरंगाबादेतील एका तरुणाची कंपनी नुकतीच अमेरिकेच्या ‘ई बे’ या कंपनीने खरेदी केली. तो तरुण अर्थात टिकेट युटिल्स कंपनीचे संस्थापक मुक्तक जोशी आणि श्रुती जोशी यांचा सत्कार एमआयटीचे महासंचालक मुनीष शर्मा यांच्या हस्ते आज गुरुवारी करण्यात आला. यावेळी ‘टिकेट युटिल्स’च्या ३० सॉफ्टवेअर अभियंत्यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जोशी म्हणाले की, एमआयटीमधील अभियांत्रिकीच्या शिक्षणाने माझ्या आयुष्याला कलाटणी दिली. मी दिवसाला १८ तास काम करीत असे. व्यवसायात सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यास फार महत्त्व आहे. स्पर्धेच्या युगात नेहमीच यश मिळत नसते. कधी अपयश आले तर खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने काम केले पाहिजे, असा उपदेश करून त्यांनी आपल्या भाषणाद्वारे विद्यार्थ्यांना उद्योग उभारणीचा मूलमंत्र दिला. याप्रसंगी एमआयटीचे प्राचार्य डॉ. संतोष भोसले, प्राचार्य डॉ. नीलेश पाटील, प्राचार्य सुनील देशमुख, माजी विद्यार्थी संघटनेचे प्रा. विनय चिद्री, संगणक विभागप्रमुख प्रा. कविता भोसले, प्रा. भक्ती अहिरवाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
औरंगाबादच्या सॉफ्टवेअरला जगभरात मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2016 01:11 IST