औरंगाबाद : मनपाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा संतसृष्टीचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले आहे. यापूर्वीच्या आयुक्तांनी या कामाला खीळ घातली, असे मनपा वर्तुळात चर्चिले जात आहे. आता नव्या आयुक्तांनी तरी याकामी पुढाकार घ्यावा, असे बोलले जात आहे. विद्यमान उपमहापौर संजय जोशी यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला. भारत माता मंदिराप्रमाणेच हाही प्रकल्प महत्त्वाकांक्षी ठरेल, असा विश्वास त्यांना वाटतो. बीओटी तत्त्वाखाली बिल्डरांच्या घशात जाणारी उल्कानगरीतील मोठी जागा या संतसृष्टीसाठी मिळवण्यात यश मिळाले. या ठिकाणी मोठे वाचनालय राहील, ध्यान केंद्र राहील. अनेक संतांचे पुतळे याठिकाणी बघावयास मिळतील; पण हे काम सध्या रखडले आहे. या कामाचा आराखडा श्रीश्रीश्री रविशंकर यांना दाखवण्यात आला होता, तेव्हा त्यांना तो खूप आवडला व स्वत:हून त्यांनी या कामासाठी एक कोटी रुपये देणगी देण्याचे जाहीर केले होते. दरम्यान, महाराष्ट्र राज्य ओबीसी जनजागरण व संघर्ष समितीचे एक शिष्टमंडळ उपमहापौर संजय जोशी यांना भेटले व त्यांच्याशी या प्रकल्पासंबंधी सविस्तर चर्चा केली. समितीने निवेदन सादर करून काही मुद्दे उपस्थित केले. ते असे : मनपाने खूप गाजावाजा केलेल्या संतसृष्टीचे काम कुठवर आले? हे काम पूर्णत्वास जाण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार आहे? संतसृष्टीत कोणकोणत्या संतांच्या पुतळ्याचा समावेश करण्यात येणार आहे? खूप गाजावाजा केलेल्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यासंबंधीही काहीच समजत नाही. दरवर्षी महाराणा प्रताप यांची जयंती येते त्यावेळी हा मुद्दा प्रकर्षाने पुढे येतो आणि नंतर काहीच होत नाही. हा पुतळा लवकरात लवकर उभा करण्यात मनपाच्या अडचणी तरी कोणत्या आहेत? कारण हा पुतळा कॅनॉट प्लेसच्या उद्यानात आहे. अडथळा ठरेल, अशा चौकात नाही. निष्काम कर्मयोगी गाडगेबाबा, संताजी जगनाडे महाराज, माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग, निळू फुले, लोककवी वामनदादा कर्डक यांचे पुतळे शहराच्या मोक्याच्या ठिकाणी उभे करण्यात यावेत, असा आग्रह ओबीसी जनजागरण व संघर्ष समितीने मनपा आयुक्तांकडे धरला आहे. औरंगपुऱ्यातील महात्मा जोतिबा फुले यांचा व मिल कॉर्नरवरील आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याची उंची बघवत नाही. या पुतळ्यांची उंची तातडीने वाढविण्यात आली पाहिजे. शिवाय, पुतळ्यांचा रंगही उडून चालला आहे. औरंगपुरा येथे फुले दाम्पत्याचा पुतळाही असाच रखडला गेला आहे. हा पुतळा त्वरित बसवण्याची मागणी वाढत आहे.फुले दाम्पत्याच्या पुतळ्याची योजना मनपाने आता थंडबस्त्यात गुंडाळून ठेवली की काय, असे वाटू लागले आहे. पुतळा बनवून तयार आहे, आता फक्त राज्य शासनाच्या एनओसीची गरज आहे, असे कितीतरी वेळा सांगितले गेले; परंतु प्रत्यक्षात औरंगाबादकरांना फुले दाम्पत्याचा पुतळा बघावयास मिळत नाही. महापालिका याबाबतीत काय करू इच्छिते, हे तरी एकदा जाहीर करावे, असे समितीच्या अध्यक्ष सरस्वती हरकळ, निर्मला बडवे, अशोक गहिलोत, जी.आर. सिरसे, गणेश पवार, गणेश धुंदे, रामनाथ कापसे यांनी म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रति मनपा विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड व भाजपा गटनेते संजय केणेकर यांनाही देण्यात आल्या आहेत. नवे आयुक्त प्रकाश महाजन यांनी विशेषत: संतसृष्टीच्या प्रकल्पात व पुतळ्यांसंबंधीच्या मागण्यांमध्ये लक्ष घालावे, असा आग्रह ओबीसी समितीने धरण्यात आला आहे.
साडेचार कोटी रुपयांच्या संतसृष्टीचे काम रखडले
By admin | Updated: December 8, 2014 00:23 IST