वैजापूर : तालुक्यातील १३२ ग्रामपंचायतींपैकी केवळ ११ ग्रामपंचायतींमध्ये सध्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम सुरू आहे. उर्वरित १२२ ग्रामपंचायतींनी हमी योजनेचे काम सुरू केले नसल्याने ग्रामीण भागात मजुरांना काम उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.मग्रारोहयोंतर्गत वर्षातून १०० दिवस नोंदणीकृत मजुरांना रोजगार मिळणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने संबंधित यंत्रणा व ग्रामपंचायतींनी कृती आराखड्यातील मंजूर कामे सुरू करावीत, त्यात ५० टक्के कामे ग्रामपंचायतींनी करण्याचे आदेश आहेत; परंतु हे काम करण्याबाबत ग्रामपंचायती उदासीन असल्याचे चित्र आहे. अनेक ग्रामपंचायतींनी यापूर्वी सुरू केलेली कामे अपूर्ण आहेत. ती कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवकांच्या मध्यंतरीच्या काळातील बहिष्कारामुळे या योजनेची कामे रखडली आहेत. परिणामी नवीन कामे सुरू करण्यासाठी कुठलीही ग्रामपंचायत पुढे येत नसल्याने योजनेची कामे कासवगतीने सुरू असून अपूर्ण कामांची संख्या वाढत आहे. प्राप्त आकडेवारीनुसार, सध्या लोणी बुद्रुक, नगिनापिंपळगाव, डवाळा, संजरपूरवाडी, घायगाव, हिंगोणी, खंडाळा, तिडी, बिलोणी व पानव खंडाळा या दहा ग्रामपंचायतींनी सुरू केलेल्या वैयक्तिक सिंचन विहिरींच्या ४६ कामांवर एकूण दोन हजार २६८ मजूर कार्यरत आहेत, तर जिरी मनोली ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या रस्त्यांच्या पाच कामांवर ८७१ मजूर काम करीत आहेत.(वार्ताहर)जनजागृती करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी नाहीगावात ग्रामरोजगार दिन पाळून मजुरांची नोंदणी करणे, मागेल त्याला काम देणे, मजुरी पट्ट्याचे वाटप व योजनेविषयी जनजागृती करण्याचे स्पष्ट आदेश आहेत; परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याने मजुरांना काम मिळत नसल्याचा आरोप मजूर करीत आहेत.
‘रोहयो’ कामांकडे ग्रा.पं.ची पाठ !
By admin | Updated: June 8, 2014 01:14 IST