हयातनगर : वसमत तालुक्यातील हयातनगर येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या नवीन इमारतीचे काम अर्धवट राहिले आहे. प्रशासकीय पातळीवरूनही या शाळेच्या जागेचा प्रश्न सोडूवन चालू शैक्षणिक वर्षात हे बांधकाम पूर्ण करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे. हयातनगर येथील जि.प.माध्यमिक शाळेस जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून नवीन इमारतीचे बांधकाम मंजूर झाले आहे. पण हे बांधकाम चुकीच्या ठिकाणी होत आहे. कारण हे बांधकाम जि.प. प्राथमिक शाळेस शासनाकडून प्रदान केलेली २ हेक्टर जमीन असताना चुकीच्या जागेवर होत आहे. जि.प. प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास एक हजाराहून अधिक आहे. या शाळेस योग्य मैदान असणे गरजेचे आहे. या संदर्भात जि.प.च्या सीईओंना शाळा व्यवस्थापन समितीने लेखी निवेदनाद्वारे स्थायी समितीच्या बैठकीत ठराव घेऊन कळविले होते. तरीही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ३० मे रोजी उपलब्ध आहे त्याच जागी बांधकाम करावे, असे आदेश काढले. यामध्ये मोठा व्यवहार संबंधित गुत्तेदार, अभियंता व जि.प. अधिकारी यांच्यात झाला असल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समितीने व्यक्त केला आहे. यामुळे या नवीन इमारतीसाठी वापरण्यात येत असलेली प्राथमिक शाळेच्या प्रांगणाची जागा न वापरता शाळेची बरीच जागा मैदान सोडून शिल्लक आहे, त्या ठिकाणीच बांधकाम करावे व या प्रकारात दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. या निवेदनावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांची स्वाक्षरी आहे. दरम्यान, या प्रकरणी २५ जून रोजी दुपारी जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी हयातनगर येथे भेट देऊन पाहणी केली. प्राथमिक शाळेच्या मैदानावर होणारे बांधकाम हे शाळेच्या इतर मोकळ्या जागेत करावे, असे उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी गटविकास अधिकारी साहेबराव कांबळे, बांधकाम उपअभियंता सदावर्ते, तुंगेवार, शिक्षण सभापती रंगराव कदम, सरपंच विजय खाडे, ग्रामसेविका मुकणे, विष्णू अंभोरे, नरहरी कोकरे आदी उपस्थित होते. हयातनगर येथील शाळेच्या जागेचा मुद्दा जि.प.च्या स्थायी समितीच्या बैठकीमध्येही चांगलाच गाजला होता. शाळा सुरू झाल्या तरी हा प्रश्न कायम आहे. (वार्ताहर)हयातनगर येथील जि.प.माध्यमिक शाळेस जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून नवीन इमारतीचे बांधकाम मंजूर झाले आहे. जि.प. प्राथमिक शाळेस शासनाकडून प्रदान केलेली २ हेक्टर जमीन असताना चुकीच्या जागेवर बांधकाम होत आहे. जि.प. प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास एक हजाराहून अधिक आहे. या शाळेस योग्य मैदान असणे गरजेचे आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ३० मे रोजी उपलब्ध आहे त्याच जागी बांधकाम करावे, असे आदेश काढले आहेत.
जि.प.शाळेच्या नवीन इमारतीचे काम अर्धवट
By admin | Updated: July 1, 2014 00:13 IST