औरंगाबाद ते पाचोरा राज्यमार्ग क्रमांक ४८ वरील या दीड कि.मी. व शेलगाव येथील एक कि.मी. अंतराच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी ओरड केल्यानंतर थातूरमातूर दुरुस्ती करायची आणि वेळ मारून न्यायची हा कारभार बांधकाम विभागाचा सुरू होता. यासंदर्भात लोकांनी वारंवार तक्रारी केल्या. ‘लोकमत’च्या वतीनेदेखील या रस्त्याची समस्या मांडली गेली. अंदाजपत्रकानुसार दर्जेदार व गुणवत्तापूर्ण काम का होत नाही, अशी भूमिका मांडल्यानंतर बांधकाम विभाग जागे झाले आहे. अखेर चौफुली ते नाचनवेल रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
------------
पाच अपघातांत तीनजणांचा बळी
डोंगरगाव फाटा ते शेलगाव या नऊ कि.मी. अंतर असलेल्या रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी पाच अपघात झाले. यात तीनजणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन दिवसांपूर्वीच पाईपलाईनसाठी खोदलेल्या रस्त्यात दुचाकी आदळून रामनगरच्या युवकाचा मृत्यू झाला. यामुळे रस्त्याची अपूर्ण कामे, खड्डे, रस्त्यालगत वाढलेली झाडे व शेतकऱ्यांनी विनापरवाना खोदलेल्या रस्त्याच्या चरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रातील दोन प्रादेशिक विभागांना जोडणारा हा एक महत्त्वाचा रस्ता असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील अपूर्ण कामे तत्काळ मार्गी लावण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.
फोटो : दीर्घ प्रतीक्षा व ‘लोकमत’च्या सततच्या पाठपुराव्याने नाचनवेल चौफुली ते नाचनवेल रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली.