ऑनलाईन लोकमत / पुरुषोत्तम करवा
माजलगांव (बीड), दि. ५ : जुन्या माजलगांव शहरातील सिंदफना नदीपात्रा शेजारी असलेल्या स्मशानभूमीमध्ये सोयी सुविधां व बांधकामासाठी सुमारे ६० लाख रुपयांचा खर्च झाला आहे. जिल्ह्यात ६० लाखाची स्मशानभूमी म्हणून चर्चेला आलेल्या या स्मशानभूमीचे काम मात्र अद्याप अर्धवट अवस्थेतच आहे.
शहराची लोकसंख्या झपाटयाने वाढत असतांना जुन्या शहरात स्मशानभूमीच नव्हती. नागरीक अनेक वर्षांपासुन अंत्यविधी सिंदफना नदी पात्रातच करीत असत. वेळोवेळी स्मशानभूमीची मागणी होत असतांनाहि नगर पालिकेच याकडे दुर्लक्ष होते. पाच वर्षांपूर्वी डॉ. अशोक तिडके हे नगराध्यक्ष असतांना त्यांनी त्यांच्या कार्यकाळात या स्मशानभूमीसाठी मंजूरी दिली. यावर जवळपास ६० लाख रुपयांचा निधी देखील मंजूर करुन आणला होता.
यानंतर स्मशानभूमीचे काम सुरु होताच निधीची उपलब्धता असतांना देखील संबंधीत गुत्तेदाराने हे काम रखडवुन ठेवले. केवळ एक शेड मारुन कामाची कित्येक दिवस हे काम त्याने लटकत ठेवले. यावेळी स्मशानभुमीचे बांधकाम लवकरात लवकर व्हावे यासाठी या भागातील रहिवाशी महेश होके यांनी स्मशानभुमीतच जवळपास पाच दिवस आमरण उपोषण केले होते. त्यानंतर प्रशासनाला जाग येवुन कामास सुरुवात करण्यात आली. यानंतर सुमारे 60 लक्ष रुपयांचा खर्च यावर करण्यात आला. तरीही स्मशानभूमीत विद्युत पुरवठा, पाण्याची व्यवस्था, अंतर्गत इंटर लॉकिंग ब्लाॅक, रंगरंगोटी तसेच बर्निंगशेड इत्यादी कामे अर्धवटच आहेत. यामुळे अंत्यविधी कार्यास आलेल्या नागरिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. विशेषत: रात्रीच्यावेळी अंत्यविधीसाठी आले असता या ठिकाणी लाईट नसल्यामुळे खूप अडचण होते. नागरिकांना गॅसबत्त्यांची अथवा बॅटरीची व्यवस्था करुनच इकडे यावे लागते. यामुळे स्मशानभूमीचे राहिलेले काम हे तात्काळ पूर्ण करण्यात यावे अशी मागणी नागरीकांमधुन जोर धरु लागली आहे.
केंद्रेकरांनी काढले होते ठेकेदाराचे वाभाडे तत्कालीन जिल्हाधिकारी केंद्रकर यांनी विषेशत्वाने मला 60 लाखांची स्मशानभुमी पहायची आहे असे म्हणुन या ठिकाणी भेट दिली होती. परंतु; प्रत्यक्षात या ठिकाणी कांहीच दिसुन न आल्यामुळे त्यांनी संबंधीत ठेकेदाराची चांगलीच खरडपटटी काढली होती. स्मशानभूमीला काय सोन्याच्या विटा लावणार आहात काय असे म्हणत त्यांनी त्याच्या कामाचे चांगलेच वाभाडे काढले होते.
ठेकेदारास नोटीस देऊ स्मशानभुमीचे काम अर्धवट अवस्थेत आहे. काम पुर्ण करण्यासाठी संबंधीत ठेकेदाराला वारंवार विनंती करुन देखील त्याने काम पूर्ण केलेले नाही. याबाबत ठेकेदाराला पालिकेकडुन नोटीस काढण्यात येणार आहे. -बी. सी. गावित, मुख्याधिकारी, माजलगाव नगर परिषद