जालना : औरंगाबाद ते नांदेड या राज्य मार्गावरील वाटूर फाटा ते मंठा या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सरकारी पातळीवरील लालफिती कारभारामुळे रखडले आहे.औरंगाबाद ते जालनापर्यंतच्या राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चार वर्षांपूर्वी पूर्ण झाले. खाजगीकरणातून या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यापाठोपाठ जालन्यापासून पुढे रामनगर,, विरेगाव, डांबरी, एदलापूर ते वाटूरफाट्यापर्यंतच्या पन्नास किमी रस्त्याचे काम बांधकाम खात्याने दुसऱ्या टप्प्यात कासवगतीने का होईना पूर्ण केले.परिणामी औरंगाबाद ते जालना तेथून पुढे वाटूरफाट्यापर्यंतच्या रस्त्यावरील दुतर्फा वाहतूक सुरळीत झाली. वाहनधारकांना दिलासा मिळाला. परंतु वाटूर फाट्यापासून पुढे दहिफळ खंदारे, केंधळी, मंठा ते हेलस, देवगाव फाट्यापर्यंतच्या रस्त्याच्या कामास मुहूर्त लागेल असे अपेक्षित होते. दुर्देवाने तिसऱ्या टप्प्यातील या कामांना आजवर मुहूूर्त लागलेला नाही. वास्तविकता वाटूर फाटा ते मंठा तेथून पुढे जिंतूर पर्यंतच्या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर होणे गरजेचे आहे. तेथून पुढे औंढा, वसमत, नांदेडपर्यंतच्या राज्य मार्गाचे काम चौथ्या टप्प्यात वेगाने होणे गरजेचे आहे. मात्र तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील चौपदरीकरणाची कामे सार्वजनिक बांधकाम खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच रखडली आहे. या दोन्ही टप्प्यातील रस्त्यांच्या कामांबाबत बांधकाम खात्याने काही वर्षांपूर्वी सर्वे केला. त्यापाठोपाठ मंत्रालयापर्यंत अहवाल सुद्धा सादर करण्यात आला. परभणी व जालना या दोन जिल्ह्याच्या हद्दीतून जाणाऱ्या या रस्त्याबाबत कार्यकारी अभियंत्यांनी सादर केलेल्या अहवालाची सरकारी पातळीवरुन फारशा गांभीर्याने पुढे दखल घेतल्या गेली नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी या संदर्भात भरघोस आश्वासने दिली. ती हवेतच विरली. प्रत्यक्षात या कामांसंदर्भात हालचाली झाल्या नाहीत. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण या विभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या परभणी - नांदेड, जिंतूर - मंठा व मंठा ते जिंतूर या तीन रस्त्यांचे कामांसंदर्भात परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करण्याची नितांत गरज आहे. त्यादिशेने या दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. तरच या रस्त्याचे काम मार्गी लागेल. अन्यथा या रस्त्याचे काम दिवसेंदिवस रखडत पडेल अशी चिन्हे आहेत. ( प्रतिनिधी)महत्त्वपूर्ण रस्ता वाटूर फाट्यापासून जिंतूर औंढा नांदेड हा आंध्र प्रदेशला जोडणारा रस्ता महत्वपूर्ण आहे. विशेषत: या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु अरुंद रस्त्यांमुळे अनेक प्रश्न उद्भवत आहेत. नांदेड, वसमत, परभणी औंढा, हिंगोली जिंतूर वैगेरे भागातील नागरिकांना औरंगाबादला ये- जा करण्याकरिता या रस्त्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे वर्दळीचा असणारा हा रस्ता दिवसेंदिवस धोकादायक होतो आहे.
वाटूर ते मंठा चौपदरीकरण थंड बस्त्यात!
By admin | Updated: July 5, 2014 00:41 IST