धर्माबाद : शहरातील बाळापूर येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारू, शिंदीची सर्रास विक्री होत असल्यामुळे अल्पवयीन मुले मद्याच्या आहारी जात असून बहुतांश जणांचे संसार उघड्यावर येत आहेत़ बाळापूर येथे दारु विक्री कायमची बंद करावी यासाठी महिला पुढे आल्या असून १७ रोजी धर्माबाद पोलिस ठाण्यासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे़येथील पोलिसांच्या आशिर्वादाने शहरातच नव्हे तर सबंध तालुक्यात अवैध दारू व शिंदीची सर्रास विक्री होत आहे़ परिणामी अवैध दारू, शिंदीमुळे किशोरवयीन मुले तर मद्यशौकीन होतच आहेत, रात्रीच्या वेळीस मद्यपि रस्त्यावर गोंधळ घालतात़ रात्री घरी आल्यानंतर महिलांना त्रास देवून घरातील दागदागिने आदी वस्तू विकून दारू पित आहेत़ यामुळे संसार उद्धवस्त होण्याची वेळ आली असून यास पोलिस प्रशासन जबाबदार असल्याचे महिलांचे म्हणणे आहे़ याबाबत अनेकवेळा निवेदन व तोंडी सांगूनही याकडे दुर्लक्ष होत आहे़ म्हणून बाटली आडवी करण्यासाठी १७ जुलै रोजी पोलिस ठाण्यासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे़ निवेदनावर रमाबाई सूर्यवंशी, गिरजाबाई सूर्यवंशी, शोभाबाई सूर्यवंशी, गोदावरी सूर्यवंशी, रेखा सूर्यवंशी, समता सूर्यवंशी, सारजा सोनकांबळे, चौत्राबाई पहेलवान, गंगाधर सूर्यवंशी, गंगाधर पहेलवान, अमृत पहेलवान, विजय सूर्यवंशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत़ (वार्ताहर)
बाळापूरात दारुबंदीसाठी महिला सरसावल्या
By admin | Updated: July 17, 2014 00:22 IST